Top Newsराजकारण

प्रत्यक्ष जंग सुरु होण्यापूर्वीच गोव्यात ‘शिमगा’ !

मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं, तेच आता उत्पल यांची औकात काढताहेत; संजय राऊतांचा पलटवार

पणजी/मुंबई: गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल यांच्या उमेदवारीवरून जोरदार शिमगा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपने उत्पल यांना तिकीट देण्यास असमर्थता दर्शवली असून, उत्पल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेने उत्पल यांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा, असे म्हटले आहे. यात पुन्हा एकदा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत, मनोहर पर्रिकर यांनी ज्यांना मोठे केले, तेच आता त्यांचे पुत्र उत्पल यांची औकात काढत आहेत, असा पलटवार संजय राऊत यांनी केला.

तुम्ही संजय राऊत यांची वक्तव्ये चालवता म्हणून ते फारच वाढत चालले आहे. मनोहर पर्रिकरांच्या मुलाबद्दल त्यांनी कशाला भाष्य करायचे? तुमचे तिथे ऐकायला कोण बसले आहे? हिंमत असेल तर संजय राऊतांनी गोव्यातील एक मतदारसंघ लढवावा. पर्रिकरांच्या मुलाला भाजपने तिकीट दिले तर तुम्ही सर्व जण निवडणूक लढणार नाही असे सांगा, असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मनोहर पर्रिकरांचा मुलगा इकडे तिकडे फिरत असून त्याला अपमानित केले जात आहे. त्याची औकात काढली जात आहे. मग तिकीट देण्याची चर्चा कधीपासून सुरु झाली. उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिल्यास आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देऊ असे आम्ही सांगितल्यानंतर भाजपची धावपळ सुरु झाली आहे. त्यांना तिकीट द्यावेच लागेल, असे सांगत भाजपने उत्पल पर्रिकरांना तिकीट देण्यासाठी इतका वेळ का लावला? भाजपवाले बोलघेवडे आहेत. तिकीट का थांबवले हा मोठा प्रश्न आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाविषयी सहानुभूती असते. मी कोणतेही राजकीय भाष्य करत नाही. मनोहर पर्रिकर गोव्यातील प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचे योगदान आहे. गोव्यात जो भाजप दिसत आहे, त्यात मनोहर पर्रिकर यांचेच योगदान आहे. गोव्यात भाजप पर्रिकरांच्या नावाने ओळखला जातो. गोव्यात, राजकारणात मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठे केले, तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत हे चांगले वाटले नाही. त्यांना तिकीट देणे, न देणे ही पुढील गोष्ट आहे. पण उत्पल पर्रिकर यांच्या जागी माफियाला तिकीट दिले जात आहे. उत्पल पर्रिकर यांचे ट्वीट मी पाहिले आहे. तिथे कोणाला तिकीट देत आहात त्यावर चर्चा करा, त्यानंतर पाहू, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

वेगळ्याच प्रकारची खिचडी, कुणालाही बहुमत मिळणार नाही

दरम्यान, संजय राऊत यांनी गोव्यात कुणालाच बहुमत मिळणार नाही, असे भाकित वर्तवले आहे. राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गोव्यातील राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केले आहे. लवकरच गोव्यात जात असून, उमेदवारांची यादी घोषित करू. राष्ट्रवादीदेखील त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करेल. आम्ही उद्या लढण्यासंबंधी चर्चा करू. गोवा लहान राज्य आहे. प्रत्येकजण आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असून, कोणलाही बहुमत मिळणार नाही. गोव्यात वेगळीच खिचडी शिजत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढत आहे. लवकरच गोव्यात जाणार आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल गोव्यात आहेत. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. त्यानंतर आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू. तसेच राष्ट्रवादीशी चर्चा केल्यानंतर कोण कुठल्या जागांवर लढणार याबाबतही निर्णय घेतला जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

उत्पल पर्रिकरांविषयी आम्हाला चिंता, भाजप त्यांना योग्य स्थान देईल : फडणवीस

उत्पल पर्रिकर यांच्याविषयी आम्हाला चिंता आहे. मी गेले महिनाभर उत्पलच्या संपर्कात आहे. आम्ही अजून त्याच्याशी चर्चा करू, असे भाजपचे नेते व गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उत्पलविषयी विचारताच फडणवीस म्हणाले की, स्व. पर्रिकर यांचे कुटुंब हे शेवटी आमचे आहे. आम्हाला उत्पलविषयी चिंता असल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आम्ही विचार केला आहे. उत्पल यांना सध्या अशा माणसांनी घेरलंय ज्या माणसांना त्यांच्या राजकीय भवितव्याची पर्वा नाही, त्या माणसांना त्यांचा स्वत:चा स्वार्थ साधायचा आहे. उत्पल यांना भाजप योग्य ते स्थान देईल, त्यांना उज्ज्वल भवितव्य असेल. उत्पलनादेखील भविष्यात संधी दिली जाईल. मी अजूनही बोलेन त्यांच्याशी, असे फडणवीस म्हणाले.‘मनोहर पर्रिकर हे आमचे फार मोठे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी कायम आदर राखला जाईल. उत्पल यांनी पक्षाचे काम करावे, असे फडणवीस म्हणाले. उत्पल यांच्याभोवती वावरणारे कार्यकर्ते त्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. त्यांच्या राजकीय भवितव्याशी ते खेळत आहेत. त्यांच्या भवितव्याशी त्यांना काही देणे घेणे नाही, असा दावाही फडणवीस यांनी केला.

विद्यमान आमदारांपैकी जवळजवळ सर्वांनाच तिकिटे मिळतील. एखादाच गळेल. एखाद-दुसऱ्याला मिळणार नाही एवढेच पण भाजप स्वबळावर गोव्यात सरकार स्थापन करू शकेल असे मी पूर्ण विश्वासाने सांगतो, असे फडणवीस यांनी नमूद केले. भाजपचे केडर काही ठिकाणी दुखावलेले असले तरी, सर्वजण पक्षासोबत आहेत. बंडखोरीची मोठी समस्या आता नाही. फक्त एक-दोन मतदारसंघांपुरतीच ती आहे, असे फडणवीस म्हणाले.

उत्पल पर्रिकरांसाठी उमेदवारी सोडण्याची ‘आप’ नेत्याची तयारी

पुत्र उत्पल पर्रिकर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्यास त्यांच्यासाठी आपण पणजीतील उमेदवारी सोडण्यास तयार असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष वाल्मिकी नायक यांनी म्हटले आहे. आपचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रिकर यांना आपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यानंतर नायक यांनी ट्विट करून उमेदवारी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपने पणजीत बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी निश्चित केल्यानंतर उत्पल यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. आपल्या समर्थकांसह त्यांनी प्रचारही सुरू केला आहे.

भाजप नेत्याचा ऐनवेळी लढण्यास नकार; उमेदवारीसाठी पक्षाची धावाधाव

डिचोली मतदारसंघात राजकीय सत्तानाट्य रंगतदार अवस्थेत पोहोचले असून भाजप उमेदवरीसाठी उच्च पातळीवर मगोचे नरेश सावळ तसेच अपक्ष डॉ. शेट्ये यांना विचारणा झाल्याने तसेच खुद्द सभापती राजेश पाटणेकर यांनी ऐनवेळी लढण्यास नकार दर्शवल्याने भाजपचा उमेदवार कोण? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महिला नेत्या शिल्पा नाईक यांना उमेदवारी आपल्यालाच मिळणार, अशी खात्री पटली होती. आताही त्यांचेच नाव पुढे येत आहे. मात्र काल राजकीय पातळीवर जी खलबते झाली, त्यामुळे निश्चितपणे शिल्पा नाईक सावध भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. सर्व बाजू पडताळून पाहून त्या निर्णय घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपाला सक्षम असा पर्यायी उमेदवार कोण? याबाबतही चाचपणी सुरू आहे. सध्या शिल्पा नाईक यांचे नाव निश्चित असल्याचे सूत्रांनी सांगितले तर नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षनेते शेवटच्या क्षणी कोणती भूमिका घेणार ते पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून भाजपने सक्षम उमेदवाराचा शोध सुरू केलेला आहे. मात्र, अद्याप त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.

दरम्यान मगोचे नरेश सावळ यांनी यापूर्वीच प्रचार सुरू केल्याने त्यांना भाजपने दिलेली ऑफर त्यांनी नाकारली. शेवटच्या क्षणी एखाद्याचा विश्वासघात करणे हे माझ्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे मी जिथे आहे, तिथे बरा आहे, हीच माझी भूमिका असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी भजपला नकार दिला. आपल्या आधीच्या भूमिकेनुसार त्यांनी प्रचार गतिमान केला आहे.

दुसरीकडे डॉ. शेट्ये यांनाही भाजपने ऑफर दिली. मात्र त्यांनीही मी अपक्षच लढणार, अशी भूमिका कार्यकर्त्यांकडे मांडली आहे. त्यामुळे आता त्यात बदल करण्याबाबत विचार नाही, अशी भूमिका घेतलेली आहे.

कुठल्याही स्थितीत निवडणूक लढवणारच; विनोद पालयेकर यांचा इशारा

विधानसभेची निवडणूक मी लढवणार आहे. मात्र, कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर ते पुढील दोन दिवसात आपण ठरवणार असल्याचे आमदार विनोद पालयेकर यांनी सांगितले. तृणमूल प्रवेशाबाबत भाष्य करणे पालयेकर यांनी टाळले.

कुठल्याही स्थितीत मी ही निवडणूक लढवणार आहे. शिवोली मतदारसंघात आपली बरीच वैयक्तिक मते आहेत. या मतांच्या जोरावर मी निवडून आलो. फक्त सोबत गोवा फॉरवर्ड पक्षाची निशाणी होती. गेल्या २० वर्षांपासून आपण राजकारणात आहोत. अनेक विकासकामे मतदारसंघात केली आहेत. त्यांच्या जोरावर आपण रिंगणात उतरणार. आपले प्रामाणिक कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याचे पालयेकर म्हणाले. रिंगणात कितीही उमेदवार उतरले तरी त्या उमेदवारांना आपल्या शुभेच्छा आहेत असे ते म्हणाले. पालयेकर हे गोवा फॉरवर्डच्या तिकिटावर शिवोलीतून निवडून आले होते. मात्र, काँग्रेस व गोवा फॉरवर्डची युती झाली असली तरी हा मतदारसंघ गोवा फॉरवर्डला सोडलेला नसल्याने पालयेकर सद्या नाराज आहेत. कॉंग्रेसतर्फे या मतदारसंघात डिलायला लोबो निवडणूक लढवणार आहेत.

माझी शेवटची निवडणूक; चर्चिल आलेमाव यांची भावूक साद

गेल्या तीन दशकांपासून मी राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. या राजकीय कारकिर्दीच्या काळात खूप जनसेवा केली आहे. सध्या मी वयाची ७२ वर्षे ओलांडली असून, आता खरोखरच राजकारणातून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. २०२२ची विधानसभा निवडणूक लढविणे ही शेवटची इच्छा आहे, असे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी स्पष्ट केले.

राजकारणात मी कधीच स्वार्थ बघितलेला नाही. कुटुंबीयासाठी राजकारण केलेले नाही. जनसेवेसाठी राजकारण केले आहे. मी बरेच राजकीय पक्ष बदलले. ते स्वार्थासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी बदलणे भाग पडले. देशात भाजपच्या सरकारला कोणीही अडथळा नाही. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता दीदी त्यांना योग्य धडा शिकवू शकतात. तृणमूल काँग्रेसने जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. त्या योजनांतून राज्यातील लोकांना लाभ मिळणार आहे. त्यासाठी मी तृणमूल काँग्रेसमधून शेवटची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मुंबईत उद्धव ठाकरे, दक्षिणेत करुणानिधी या सर्वांनी आपल्या कुटुंबीयांना राजकारणात उतरविले आहेत. राज्यात प्रतापसिंग राणे, विश्वजित राणे, बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, मायकल लोबो, डिलायला लोबो, बाबू कवळेकर, सावित्री कवळेकर हे सर्वजण कौटुंबिक राजकारण करीत आहेत. मग आमचे कुटुंबीय राजकारणात उतरले, तर त्यांच्यावर कौटुंबिक राजकारणाचा लोक ठपका का ठेवतात? इतर राजकारण्यांवर असा ठपका का ठेवला जात नाही? असा सवाल आलेमाव यांनी उपस्थित केला.

गोवेकरांना अल्पसंख्याक बनवण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत कुठल्याही थराला जाऊ शकतात

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले की, भाजप सरकारने गोंयकारांचा टॅग बिगर गोमंतकियांना देण्यासाठी ‘भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक’ आणले होते, जे विरोधकांनी आवाज उठवल्यानंतरच रद्द करण्यात आले. पण भाजपची पुन्हा सत्ता आल्यास हे विधेयक कायद्यात रुपांतरीत करून ते गोव्यात गोंयकारांनाच अल्पसंख्याक बनवतील.

फातोर्डा येथील जनमत कौल दिनाच्या निमित्ताने ओपिनियन पोल चौकात स्मारकाला पुष्पहार अर्पण करून जनमत कौल दिन साजरा केला. त्यावेळी सरदेसाई बोलत होते. डॉ. जॅक सिक्वेरा यांनी गोव्याची अस्मिता जपली होता. तसेच गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण रोखण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यांच्यासोबत शाबू देसाई, उल्हास बुयांव, रवींद्र केळेकर, अड. उदय भेंब्रे, चंद्रकांत केणी व इतरांनी गोव्याच्या अस्मितेसाठी लढा दिला. यासाठी विधानसभा संकुलात डॉ. सिक्वेरा यांचा पुतळा बसवायचा होता, पण भाजपने तो बसविला नाही, असे सरदेसाई यांनी सांगितले.

ते म्हणाले की, भाजपने हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाने डॉ. सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला. दोडामार्ग पंचायत आणि नगरपालिकेने गोव्याचा भाग होण्यासाठी ठराव घेतले होते. या सरकारवर विश्वास ठेवता येत नाही. कारण गोव्याच्या लोकांना अल्पसंख्याक बनवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कुठल्याही थराला जाऊ शकतात. ही निवडणूक आणखी एक ‘ओपिनियन पोल’ असेल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button