Top Newsराजकारण

गिरीश महाजन यांच्यामुळेच माझ्या मुलीचा पराभव; एकनाथ खडसेंच्या आरोप

जळगाव: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे महाजनच असल्याचं मला कालच समजलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

खडसे आणि महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देण्याचा हा सिलसिला सुरू असतानाच खडसे यांनी महाजन यांच्यावर नवा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे महाजनच आहे. हे मला कालच समजलं, असं सांगतानाच मी भाजपमध्ये असलेल्यांना सांगतो की, अरे भाजपवाल्यांनी माझे असे हाल केले. तुम्ही काय त्यांची हाजीहाजी करता. राष्ट्रवादीत या, असं आवाहन खडसे यांनी भाजपमधील नेत्यांना केलं.

नाथाभाऊला महाराष्ट्रात बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. पण नाथाभाऊ त्यांना भारी आहे. गिरीश महाजन यांना मी आवाहन करतो की, मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल. या उलट बीएचआर घोटाळ्यातून तुम्ही १० कोटींची जमीन खरेदी केली आहे. माझ्याकडे उतारे आहेत, असा दावा खडसे यांनी केला.

मी तुमचा बीएचआर घोटाळा बाहेर काढला. त्यामुळेच यांचा जीव धकधक करत आहे. गरीबांच्या ठेवींवर यांनी दरोडे घातले आहेत. ईडीचा विषय आता संपला आहे. कोर्टात माझ्याविषयीची चार्जशीट दाखल झाली आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. मी फक्त कोर्टाला घाबरतो, असं ते म्हणाले.

यावेळी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. राष्ट्रवादीत आल्यानंतरच मला भाजपमधील नीच आणि गद्दार कोण हे समजलं आहे. मी चाळीस वर्ष जीवाची पर्वा न करता भाजपमध्ये काम केलं. त्याच गद्दारांनी माझ्यावर अन्याय केला. हे गद्दार कोण आहेत हे एकदा गुगलवर सर्च करून पाहा. टरबूज असं सर्च करून पाहा, मग कळेल गद्दार कोण?, अशी टीका त्यांनी फडणवीसांचं नाव न घेता केली. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. दाऊद व दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध जोडले. माझं मंत्रिपद काढून घेतलं, असा हल्लाबोलही त्यांनी फडणवीसांवर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button