Top Newsआरोग्यराजकारण

१५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारीपासून लसीकरण; पंतप्रधान मोदींची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मोदींच्या घोषणेचे स्वागत

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. आपण वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसारच कोरोना विरोधातील लढाई लढत आहोत. आपले वैज्ञानिक कोरोनावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. सध्या देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे सावध राहण्याची आवश्यकता आहे. असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी, आता आपण १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरणाला सुरुवात करत आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली. ते कोरोना पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करत होते.

मोदी म्हणाले, अद्याप कोरोना संपलेला नाही, त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना लस मिळाल्याने कोरोनाविरोधातील लढाई आणखी मजबुत होईल. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांची चिंताही दूर होईल. या शिवाय कोरोना वॉरियर्सनाही लसीचा बुस्टर डोस दिला जाणार आहे.

१५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांबरोबरच कोरोना विरोधातील लढाईत महत्वाचे योगदान देणाऱ्या हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सनाही कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना खबरदारीचा उपाय म्हणून १० जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात होईल, याच बरोबर ६० वर्षांवरील सहव्याधीग्रस्त नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी घोषणाही यावेळी पंतप्रधान मोदींनी केली.

अफवांपासून दूर राहा

याच वेळी पंतप्रधान मोदींनी, अफवा आणि भीती निर्माण करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यांवर विश्वास ठेऊ नका त्यांपासून दूर राहा. आपण सर्वांनी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबविली आहे. आपल्या सर्वांचे प्रयत्नच देश करोनाविरोधात मजबूत करतील.

आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देणार

यावेळी मोदी यांनी नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळातही कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. जगभरात ओमायक्रोनचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे मास्कचा जास्तीत जास्त वापर करा, असं मोदी यांनी सांगितलं.

३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

केंद्राची विशेष पथके दहा राज्यांमध्ये रवाना

ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दहा राज्यांमध्ये विशेष पथके पाठवली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, ज्या १० राज्यांमध्ये ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे आढळत आहेत आणि ज्याठिकाणी कोरोना लसीकरण कमी झाले आहे, त्याठिकाणी केंद्रीय पथके तैनात केली जात आहेत.

या राज्यांमध्ये केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब यांचा समावेश आहे. ही पथके राज्यांमध्ये तीन ते पाच दिवस तैनात राहतील आणि राज्याच्या आरोग्य अधिकार्‍यांशी जवळून काम करून परिस्थितीचे आकलन करतील आणि उपाययोजना सुचवतील. तसेच, सार्वजनिक आरोग्य उपक्रमांचा अहवाल दररोज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारला देतील.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय पथके विशेषत: मॉनिटरिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे नियंत्रण ऑपरेशन्स, तसेच जीनोम सिक्वेन्सिंगसाठी कोरोना चाचणीचे नमुने पाठवण्याचा निर्णय घेतील. याशिवाय, ते कोविड प्रोटोकॉलची अंमलबजावणी, रुग्णालयात खाटांची उपलब्धता, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर, वैद्यकीय ऑक्सिजन, लॉजिस्टिक आणि लसीकरणाची उपलब्धता यासंदर्भात पाहणी करतील.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :

– नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळातही कोरोनाबाबत काळजी घ्या
– भारत कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठी कामगिरी करत आहे.
– नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे.
– व्हायरस म्युटेट होत असल्याने आव्हाने देखील वाढले आहे.
– लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.
– आतापर्यंत १४१ कोटी जनतेचं लसीकरण झालेलं आहे.
– भारताची आर्थिक स्थितीही उत्साहजनक आहे. पण कोरोना अजूनही गेलेला नसल्याने काळजी महत्त्वाचं आहे.
– देशातील ६१ टक्के नागरिकांचं दोन डोस पूर्ण.
– मास्कचा जास्तीत जास्त वापर करा.
– जगभरात ओमायक्रोनचा वेगाने फैलाव होत आहे.
– ओमायक्रोनला घाबरू नका, काळजी घ्या.
– ओमायक्रॉनची सध्या चर्चा होत असून देशातील शास्त्रज्ञांचे त्यावर लक्ष आहे.
– देशात नव्या संकटाचा सामना करण्यासाठी १ लाख ४० आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे
– १० जानेवारी २०२२ पासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरच्या सल्ल्यानंतर बूस्टर डोस देण्यात येईल.
– ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मोदींच्या घोषणेचे स्वागत

पंतप्रधानांच्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील सात डिसेंबररोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती. पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांनादेखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल. तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडूनही स्वागत

ओमिक्रॉनच्या धास्तीने जगाबरोबर देशाची आणि राज्याची चिंता वाढवली आहे, त्यामुळे लसीकरण मोहीम आणखी मजबूत करण्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा भर आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. ओमिक्रॉनचा फैलाव वाढल्यानंतर फ्रंट लाइन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याचा विचार सुरू होता, तशी मागणी आदित्य ठाकरे यांनीही पत्र लिहून केली होती.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी १६ नोव्हेंबरला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बूस्टर डोस देण्याची तसेच मुलांना लस देण्याची मागणी केली होती. पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे कोविडची बाधा होण्याची शक्यता कमी होईल आणि कोविड विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील ८ विभागांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ

कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. ही वाढ प्रामुख्याने शहर भागात आढळून आली आहे. रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर मुंबईत ०.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कुलाबा, फोर्ट, वांद्रे पश्चिम, वरळी, ग्रँट रोड, सायन, चेंबूर आणि अंधेरी या विभागांमध्ये दैनंदिन रुग्णवाढ ०.११ ते ०.६ टक्के एवढी आहे.

मुंबईत कोरोनमुक्त होण्याचे प्रमाण ९७ टक्के एवढे आहे. सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतरही मुंबईतील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात होता. मात्र मागील काही दिवस दोनशेच्या घरात असलेली दररोजच्या बाधित रुग्णांची संख्या आता ७५० वर पोहोचली आहे. शनिवारी एका दिवसात ७५७ नवीन रुग्ण सापडल्याने आता ३७०३ सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

धारावी पॅटर्नमुळे जी उत्तर विभागाच्या हद्दीतील दादर, माहीम, धारावी परिसरात कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला होता. हा विभाग कोरोना मुक्तीच्या मार्गावर असल्याचे चित्र होते. मात्र आता या विभागातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. शनिवारी धारावीत सहा, दादर आणि माहीममध्ये प्रत्येकी आठ बाधित रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी दादर येथील प्रयोगशाळेत १२ कर्मचारी बाधित आढळून आल्यानंतर येथील कोविड चाचणीचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button