बनावट पासपोर्टचा वापर करून परमबीर सिंग यांचे भारतातून पलायन !

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बनावट पासपोर्ट वापरून भारतातून पळ काढल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी परमबीर सिंग यांच्यासाठी लुकआऊट नोटीस काढण्याच्या आधीच त्यांनी भारत सोडल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर हे जुलैमध्ये जारी करण्यात आले होते. परमबीर सिंग सुट्टीवर गेल्यावर दोन महिन्यांनी ही नोटीस जारी करण्यात आली होते.
एएनआय या वृत्तसंस्थेला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, एखाद्या व्यक्तीला लुक आऊट सर्क्युलर नोटीस जारी केल्यानंतर त्या व्यक्तीला एअरपोर्ट इमिग्रेशनच्या प्रक्रियेत अडवले जाते. त्यामुळे इमिग्रेशन प्रक्रिया पुर्ण करून देश सोडण्याची शक्यता जवळपास शून्यच असल्याचे त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. जेव्हा एखाद्या व्यक्तीविरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात येते, त्यावेळी अशा व्यक्तीचा पासपोर्ट हा संबंधित यंत्रणेकडून ताब्यात घेण्यात येतो. परमबीर सिंह यांच्याविरोधात एफआयर दाखल केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने लुक आऊट सर्क्युलर नोटीस जारी केली, असे त्या अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले.
बनावट पासपोर्टच्या आधारेच परमबीर सिंग यांनी भारताबाहेर पळ काढल्याची दाट शक्यता त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट आयडी आणि स्वतःचा फोटो वापरून हा बनावट पासपोर्ट तयार केलेला असू शकतो, अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली. अनेकदा बनावट पासपोर्ट असलेल्या व्यक्तींना अटक होतेच, पण ही संपुर्ण संगणकीय प्रक्रिया असल्याने मानवी हस्तक्षेपाअभावी अनेकदा व्यक्ती बनावट पासपोर्टद्वारे निसटतात असेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले की, तपास यंत्रणांनाही परमबीर सिंग कुठे आहेत, याबाबतची माहिती नाही. परमबीर सिंग हे रशियाला गेल्याची शक्यता वर्तवणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. पण सरकारी अधिकारी म्हणून सरकारच्या परवानगीशिवाय ते असा अधिकृतपणे प्रवास करू शकत नसल्याचेही तो अधिकारी म्हणाला.
परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता. बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून ही वसुली करण्याचे आदेश देशमुख यांनी दिल्याचेही त्यांनी म्हटले होते. एपीआय सचिन वाझेच्या माध्यमातून अनिल देशमुख ही सगळी वसुली करत असल्याचेही आरोप परमबीर सिंग यांनी केले होते.
परमबीर सिंग यांना डिमोटेड करत त्यांना होमगार्ड विभागाचे महासंचालक ही नवीन जबाबदारी देण्यात आली होती. २२ मार्चला त्यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरून काढण्यात आले. अॅटेलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा फटका त्यांना बसला. केंद्रीय तपास यंत्रणेसमोर ते ७ एप्रिलला आपला जबाब नोंदविण्यासाठी हजर झाले होते. पण एनआयएने वारंवार समन्स बजावूनही ते पुढील तपासासाठी हजर झाले नाहीत.




