उद्धव ठाकरेंची जोरदार फटकेबाजी; मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख आणि फडणवीसांकडून दिलगिरी
मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विरोधकांवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांनी नारायण भंडारी या काल्पनिक पात्रावरून एक किस्सा ऐकवून विरोधकांची भंबरी उडवली. त्यामुळे विरोधकांचा चांगलाच तिळपापड झाला आणि विधानसभेत एकच गोंधळ सुरू झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांचा कुणीतरी ऐकेरी उल्लेख केल्याने त्याला शिवसेनेने जोरदार आक्षेप घेताच. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आसनावर उभं राहून सदस्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा पाडला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत उभे राहिले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या एकएका मुद्दयाचा पर्दाफाश केला. यावेळी त्यांनी नारायण भंडारी या काल्पनिक पात्राचा किस्सा ऐकवला. नारायण भंडारी नावाचं एक पात्रं असतं. ते पत्रकार परिषद घेतं. पत्रकार परिषद कशासाठी घेतली असं त्याला विचारलं जातं. तेव्हा हॉस्पिटलमध्ये लाच घेतली त्याच्यावर कारवाई कराल तर याद राखा. खबरदार आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. त्यासाठीच ही प्रेस घेतली आहे, असं हा नारायण भंडारी सांगतो. असे नारायण भंडारी, माधव भंडारी गावोगावी असतात… भाजप म्हणजे नारायण भंडारी आहे… माधव काय आणि नारायण काय दोन्ही दिवेच आहेत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख
मुख्यमंत्र्यांनी नारायण भंडारीचा किस्सा ऐकवताच भाजप नेत्यांचा तिळपापड झाला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच विरोधकांनी गोंधळ घातला. जोरजोरात घोषणाबाजी केली. काही सदस्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. वाढत्या गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांनाही आपलं भाषण थांबवावं लागलं. मुख्यमंत्र्यांचा सभागृहात एकेरी उल्लेख होताच मुख्यमंत्र्यांच्या पाठी बसलेले परिवहन मंत्री अनिल परब प्रचंड संतापले. अनिल परब तात्काळ आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख नको, विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या सदस्याला समज द्यावी, अशी जोरदार मागणी केली.
फडणवीसांची सारवासारव आणि दिलगिरी
मुख्यमंत्र्यांचा सभागृहात अवमान झाल्याचं लक्षात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लगेचच उभे राहिले आणि त्यांनी सारवासारव केली. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असले तरी मुख्यमंत्रीपद हे सन्मानीयपद आहे. त्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे. तसा उल्लेख झाला असेल तर मी स्वत: दिलगिरी व्यक्त करतो, असं सांगत फडणवीसांनी या वादावर पडदा पाडला.
…आणि नटसम्राट आठवला, पण कुणी किंमत देता का किंमत अशी स्थिती, मुख्यमंत्र्यांचे फटकारे
राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणबाजीवर तर मुख्यमंत्र्यांनी थेट नटसम्राट नाटकाची आठवण झाल्याचा टोला लगावला. त्याचबरोबर सीमा भाग, मराठी भाषा दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुनही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं.
विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास झाल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुनगंटीवारांच्या भाषणादरम्यान नटसम्राटमधील मी अथ्थेलो, मी आहे हॅम्लेट असा भास झाला. पण शेवटी कुणी किंमत देतं का किंमत अशी स्थिती असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. मुनगंटीवार यांच्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भीती वाटत होती, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. त्याचबरोबर मी आणि मुनगंटीवार हाडाचे कलाकार आहोत. पण कलेला राजकारणात वाव नाही. मात्र, मुनगंटीवार यांना संधी मिळाली की त्यांची कला उफाळून येते. पण सुधीरभाऊ तुमच्यातला कलाकार मारु नका, अशा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना दिला आहे.
संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन भाजपला टोला
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेनेत जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. इतकच नाही तर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव दिल्यावरुनही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर शरसंधान साधलं. वल्लभाई पटेल यांचं नाव हटवून नरेंद्र मोदींचं नाव त्या स्टेडियमला दिलं आहे. आता त्या स्टेडियमवर भारत प्रत्येक मॅच जिंकणार, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. त्याचबरोबर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करु, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलाय. पण राज्यानं ज्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा निर्णय घेतला, तो प्रस्ताव सध्या कुठे रखडला आहे? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलाय.