Top Newsराजकारण

कुमार विश्वास यांच्या व्हीडिओवर निवडणूक आयोगाची आधी बंदी, नंतर परवानगी ! कारण काय?

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांचा व्हीडिओ समोर आल्यानंतर ‘आप’ बॅकफूटवर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

‘आप’च्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने व्हीडिओच्या प्रसारणावर बंदी घातली होती. मात्र तासाभरानंतरच ती बंदी काढण्यात आली. राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एका पत्रात राजकीय पक्षांना व्हिडिओ प्रसारित करू नये असे सांगितले होते. मात्र काही तासांनंतर हा आदेश मागे घेण्यात आला. पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस करुणा राजू यांनी सांगितले की, हे पत्र ‘नकळत चुकून’ जारी करण्यात आले आहे. कुमार विश्वास यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. याचाच एक भाग एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला होता, जो खूप व्हायरल होत आहे. यामध्ये कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर खलिस्तानी घटकांशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी संध्याकाळी आपचे पंजाबचे सह-प्रभारी राघव चढ्ढा यांनी निवडणूक आयोगाचे पत्र ट्विट केले, “पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एएनआयला दिलेला कुमार विश्वास यांचा प्रक्षोभक व्हीडिओ मीडिया तसेच राजकीय पक्षांनी घेतला आहे. संहितेचे उल्लंघन लक्षात घेऊन, प्रकाशन/प्रसारण करण्यास मनाई आहे, असे म्हटले होते.

हे पत्र आयएएस अधिकारी डीपीएस खरबंदा यांनी आम आदमी पार्टीच्या तक्रारीनंतर लिहिले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की व्हीडिओ एमसीएमसी (मीडिया प्रमाणन आणि देखरेख समिती) च्या आदेशाच्या विरोधात आहे आणि आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे स्पष्टपणे उल्लंघन करतो. सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनेलवर या व्हीडिओचे प्रसारण ताबडतोब थांबवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत, असे त्यात म्हटे होते. पण, तासाभरानंतरच ही बंदी मागे घेण्यात आली.

मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस करुणा राजू यांनी सांगितले की, हे पत्र त्यांच्या निदर्शनास येताच तात्काळ मागे घेण्यात आले. दुसरीकडे राघव चड्ढा यांच्या वतीने पत्रकार परिषदही घेण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी कुमार विश्वास यांनाच प्रश्न विचारले. राघव म्हणाले की, अरविंद केजरीवाल खलिस्तानी समर्थक असते, तर तुम्ही ही बाब सुरक्षा यंत्रणांना का नाही सांगितली? तुम्ही २०१६ मध्येच पक्ष का सोडला नाही? राज्यसभेची खुर्ची मिळाली नाही, तर हा अपप्रचार सुरू केला. तुमचाही यात सहभाग आहे का? असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button