राजकारण

पंढरपूर विधानसभा पोटनिवणुकीसाठी भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा

मुंबई : पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

पंढरपूर मतदारसंघाचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादीकडून आदरणीय शरद पवारसाहेबांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. पंढरपूर मतदारसंघातून ते नक्की विजय होतील असा विश्वास व्यक्त करतानाच भगीरथ भालके यांना जयंत पाटील यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

भाजपने या निवडणुकीत समाधान अवताडे यांना तिकीट दिलं आहे, तर शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी बंडखोरी केल्यामुळे आता इथे तिरंगी लढत होण्याची चिन्हं आहेत. भगीरथ भालके यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीतूनच प्रचंड विरोध होत होता. राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादीची घोषणा लांबली.
भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. यावेळी भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. त्यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व 18 संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली होती.

भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे मतदारसंघात भालके कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे भगीरथ भालकेंना तिकीट देण्यासाठी काही कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र भगीरथ भालके यांच्यापेक्षा जयश्री भालके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या निवडून येण्याची शक्यता अधिक असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्याचीही चाचपणी झाली. परंतु अखेर भगीरथ भालके यांनाच संधी देण्याचं ठरलं.

अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस
मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Assembly By-Election) अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाजप उमेदवार समाधान महादेव आवताडे (Samadhan Awatade) यांचा अर्ज भरण्यासाठी दिग्गज नेते उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक तसेच जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि पदाधिकारी उद्या सकाळी उपस्थित राहणार आहेत.

पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button