
मुंबई : एमपीएससीची १४ मार्च रोजी होणारी पूर्व परीक्षा (MPSC Exam 2020) पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत होता. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये देखील कुरबूर पाहायला मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान आता एमपीएससी परीक्षेसाठी नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता २१ मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची १२ तासात दाखल घेऊन त्यांना दिलासा दिला आहे. मात्र दिल्ली सीमेवर १०० दिवसांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असूनही केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांना त्यांची दाखल घ्यावीशी वाटत नसल्याबद्दल टीका होत आहे.
लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०२० पुढे ढकलण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रक गुरुवारी जारी केले होते. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. दिवसभराच्या गदारोळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी शुक्रवारी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. यानुसार लोकसेवा आयोगाने सुधारित प्रसिद्धी पत्रक जारी करत येत्या २१ मार्चला एमपीएससीची परीक्षा होणार असल्याचे जारी केले आहे.
आज जारी करण्यात आलेल्या नव्या प्रसिद्धीपत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने असं म्हटलं आहे की ही परीक्षा 21 मार्च, 2021 अर्थात महिन्याच्या तिसऱ्या रविवारी होणार आहे. या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, 14 मार्च रोजी नियोजित परीक्षेकरता विद्यार्थ्यांना जे प्रवेश प्रमाणपत्र ऑनलाइन वितरीत करण्यात आले होते आणि ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा होती तेच कायम राहील. याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, शनिवार दिनांक 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 तसंच रविवार 11 एप्रिल रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार आहेत. त्यात कोणताही बदल केलेला नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. परंतु येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होणार असे वचन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिले होते. परीक्षार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिने हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा देताना पाणी देणारा, सुपव्हिजन करणारा कर्मचारी हा कोरोना बाधित तर नाही ना अशा दडपणाखाली विद्यार्थी नसायला पाहिजे यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी केलेला कर्मचारी आणि कोरोना लस घेतलेलाच कर्मचारी परीक्षा घेण्यास उपस्थित राहील अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.