
मुंबई : विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन आता पुन्हा एकदा जोरदार राजकारण रंगण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकरणात निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या हितासाठी लवकरात लवकर निर्णय राज्यपालांनी घेतला पाहिजे, असं सूचित केले आहे. त्यामुळे आता राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतील आणि त्या आमदारांची नियुक्ती करतील, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलीय.
विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर आज हायकोर्टाचा निकाल जाहीर झाला असून संविधानिक पदाला आदेश देऊ शकत नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले. यावर बोलताना नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राज्यसरकारने मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार विधानपरिषदेवर १२ आमदारांची नावे निश्चित करून प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता त्याला आता ९ महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्याप राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही.
राज्यपालांनी किती वेळेत याचा निर्णय घ्यावा यावर कायद्यात तरतूद नाही. मात्र, राज्यसरकारच्या मंत्रीमंडळात एखादा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी देण्याचे काम राज्यपालांचे असते आणि ते त्यांना बंधनकारक आहे, अशी कायद्यात तरतूद असल्याचं नवाब मलिक म्हणाले. मात्र, असं असताना याचा गैरफायदा घेत राज्यपाल अनिश्चित काळासाठी १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवत आहेत हे योग्य नाही, असंही मलिक यांनी म्हटलंय.
हायकोर्टाने सूचित केल्यामुळे राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील. दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे हे कोर्टाचे म्हणणे आहे. निश्चितरुपाने समन्वय असला पाहिजे परंतु त्या पदावर बसलेला व्यक्ती संवैधानिक पदी असतो. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव नसला पाहिजे. राज्यपाल हे राजकीय पक्षाचे व्यक्ती नाही याचं भान राज्यपालांनी ठेवलं पाहिजे असं स्पष्ट मतही नवाब मलिक यांनी व्यक्त केलंय.
राज ठाकरेंना वाचन वाढविण्याचा खोचक सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यात आली असून, राज ठाकरे यांनी वाचन वाढवावे, असा खोचक सल्ला देण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातील विधानाचा समाचार घेत प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांनी वाचन वाढवण्याचा सल्ला देत, राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहिती नसावे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहिती नसावे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे, असेही मलिक यांनी म्हटले आहे.




