
टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा धमाका सुरुच आहे. अॅथलिट प्रवीण कुमारने उंच उडीत रौप्य पदक जिंकल्यानंतर भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमधील ५० मीटर राइफल थ्री पोजिशन स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा हिने कांस्यपदक पटकावले आहे.
याआधी अवनी लेखरा हिची टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली होती. १० मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्णपदक मिळाले होते. दरम्यान, अवनी लेखराने क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवे स्थान पटकावले होते.
ऑलिम्पिक असो वा पॅरालिम्पिक या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी अवनी ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. तत्पूर्वी पी.व्ही. सिंधू आणि मीराबाई चानू यांनी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गटात रौप्यपदके जिंकली होती. तसेच पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची चौथी खेळाडू आहे.
या स्पर्धेत मुरलीकांत पेटकर यांनी १९७२ मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्यानंतर देवेंद्र झाझरियाने भारतासाठी दुसरे आणि तिसरे पदक जिंकले. तर चौथे पदक मरियप्पन थंगावेलू याने जिंकले होते.