मुंबई : मुंबईतील क्रूझवर झालेल्या ड्रग्स केस प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर काल प्रभाकर साईल या किरण गोसावीच्या बॉडीगार्डने गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आर्यन खानला सोडवण्यासाठी २५ कोटींचे डील झाले होते. तसेच १८ कोटींना व्यवहार पक्का झाला होता. त्यातील आठ कोटी रुपये हे समीर वानखेडेंना दिले जाणार होते. असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. दरम्यान, या आरोपांनंतर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर हिने ट्विट केले आहे.
क्रांती रेडकर या ट्विटमध्ये म्हणाली की, ‘जेव्हा तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहता तेव्हा बुडण्याचा धोका असतो. मात्र जेव्हा जगातील सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्यासोबत असतो तेव्हा जगातील कुठलीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही. सत्यमेव जयते.’
When you swim against the tide , it may drown you, but if the almighty is with you , no tide this is world is big enough to drown you. Because , only HE 👆🏻knows the truth 🙏🙏🙏 good morning . SATYAMEV JAYATE.
— KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) October 25, 2021
काल प्रभाकर साईल या किरण गोसावीच्या बॉडीगार्डने केलेल्या धक्कादायक गौप्यस्फोटांमुळे खळबळ उडाली होती. आर्यन खान प्रकणामध्ये २५ कोटींची डिल ठरली होती. त्यामधील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना देण्याचे ठरले होते. तसेच कोऱ्या कागदावर आपल्या सह्या घेण्यात आल्या होत्या, असा दावा प्रभाकर साईलने केला होता. प्रभाकर साईलने केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे.
व्हायरल झालेला जन्माचा दाखला खोटा, कोर्टात चॅलेंज करणार : वानखेडे
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून वानखेडे प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे, असा इशारा समीर वानखेडे यांनी दिला आहे.
समीर वानखेडे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. आपल्याबाबत खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात आहेत. आपण या प्रकाराला चॅलेंज करणार आहोत. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. माझा म्हणून जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. माझ्याविरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे. त्याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे. याबाबत आपण लवकरच जाहीर खुलासा करणार आहे, असं वानखेडे यांनी सांगितलं.