Top Newsराजकारण

नरेंद्र मोदी प्रचंड अहंकारी; भाजपच्या राज्यपालांचा घरचा आहेर

नवी दिल्ली : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक पुन्हा एकदा त्यांच्या विधानाने चर्चेत आले आहेत. रविवारी मलिक यांनी थेट भाजप नेतृत्वावर आक्रमक टीका केली. देशात कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर सुरु होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत माझी भेट झाली तेव्हा ते खूप अहंकारात होते. ५ मिनिटांत माझ्यात आणि त्यांच्यात वाद झाल्याचा खुलासा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

हरियाणाच्या दादरी येथे एका सामाजिक कार्यक्रमात सत्यपाल मलिक बोलत होते. ते म्हणाले की, जेव्हा देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते तेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेलो होतो. या भेटीत ५ मिनिटांत माझ्याशी त्यांचा वाद झाला. ते खूप गर्विष्ठ आहेत. जेव्हा मी त्यांना सांगितले आमचे ५०० जण मृत्यू पावलेत तेव्हा माझ्यासाठी मेलेत का? असा प्रश्न त्यांनी केला. तेव्हा मी तुमच्यासाठीच मेलेत तुम्ही राजा बनलात त्यावर माझ्याशी त्यांचा वाद झाला. या वादानंतर पंतप्रधानांनी मला अमित शाह यांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर मी अमित शाहांकडे गेलो असं त्यांनी सांगितले.

दादरी येथील पत्रकारांनी सत्यपाल मलिक यांना कृषी कायदे रद्द केल्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, पंतप्रधान जे काही बोलले त्यावर आणखी काय बोलायचं? आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. एमएसपी कायद्यासाठी त्यांची मदत हवी. अद्यापही अनेक निर्णय प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांविरोधातील गुन्हे सरकारने मागे घेतले पाहिजेत. एमएसपीवर कायदा बनवण्याची गरज आहे अशी मागणीही त्यांनी केली. यापूर्वीही सत्यपाल मलिक यांनी शेतकऱ्यांचं खुलेपणानं समर्थन केलं होतं.

शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, जर त्यावर मी काही वक्तव्य केलं तर त्यावर वाद होतील. राज्यपालांना हटवलं जाऊ शकत नाही, परंतु माझे काही शुभचिंतक आहेत, जे याच शोधात असतात की मी काही बोलेन आणि हटवलं जाईल, असंही मलिक यांनी सांगितले होते. मला दोन तीन जणांनी राज्यपाल बनवलं आहे. शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलल्यास त्यांना समस्या निर्माण होतील, मला याचा अंदाज आहे. परंतु जर त्यांनी काही समस्या आहेत असं सांगितलं तर पद सोडण्यासाठी मी एक मिनिटही वाया घालवणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button