पुणे : काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहे. नाना पटोले यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यामध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचाही समावेश होता. अमृता फडणवीस यांनी ‘नन्हे पटोले’ म्हणत ट्विटरवरून टीका केली होती. त्यावरुन, अमृता फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पटलवार केला आहे.
अमृता फडणवीस यांनी खोचक ट्विट करत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर हल्लाबोल केला होता. नाना पटोले, संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरुन, आता रुपाली ठोंबरे यांनी अमृता फडणवीसांना आवरा, अशी साद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घातली आहे. तसेच, आपली नावडती बहिणी म्हणून माझं ऐका असेही रुपाली पाटील यांनी म्हटलंय.
आमच्या माजी मिसेस मुख्यमंत्री वहिनीसाहेबांबद्दल काय सांगायचं? आमचे विरोधी पक्षनेतेभाऊ वहिनींना अडवतच नाहीत, या गोष्टीचं दु:ख होतंय. कारण, अमृती फडणवीसांनी पदाची गरिमा धुळीला मिसळली आहे, त्या म्हणतात नॉटी नामर्द, बिघडे नवाब, नन्हे पटोले… यासंह त्यांच्या विधानाचे रुपाली पाटील यांनी वाचन केले. तसेच, आपण कोणत्या पक्षाच्या आहात हे स्पष्ट करा, आपण मागे बोलला होतात. माझा पक्षाशी काहीही संबंध नाही, मी एक समाजसेविका आहे, मग तुमची ही भाषा समाजाला कशी चालेल? असे म्हणत रुपाली ठोंबरेंनी अमृता फडणवीस यांची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला.
महाविकास आघाडी सरकार चुकत असेल तर टीका आणि चर्चा करा. पण, भाऊराया वहिनीसाहेब अत्यंत अंधाधुंद वागत आहेत, माजी मिसेस मुख्यमंत्र्यांची प्रतिमा त्यांनी धुळीला मिळवलीय. शेतकऱ्यांना साले म्हणणारे कोण आहेत, शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणारे कोण आहेत, पोलीस कर्मचाऱ्यांची खाती एका बँकेतून दुसऱ्या बँकेत वळविणारे कोण आहेत? असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.