
मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. मुंबईतील आझाद मैदानावर शेकडो एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि खोत यांच्यावर निशाणा साधलाय. मी पडळकर आणि खोत यांच्याशी दोन वेळा बोललो आहेत. त्यांच्यासमोर सरकारचे प्रस्ताव ठेवले आहेत. ते एसटी कर्मचाऱ्यांशी बोलून पुन्हा येतो म्हणून गेले आहेत. कदाचित कामगारांना समजावण्यात ते कमी पडले असतील. नाहीतर कामगार त्यांचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील. मात्र, सर्वांसाठी चर्चेची दारं खुली आहेत. कुणीही आमच्याकडे चर्चेसाठी यावं, असं आवाहन परब यांनी केलंय.
दरम्यान, एसटी कमर्चाऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची आज संध्याकाळी ५ वाजता बैठक होणार आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनाही बोलावल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना काय देता येऊ शकतं, याबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं परब यांनी सांगितलं. तसंच एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचं आवाहन परब यांनी पुन्हा एकदा केलं आहे.
अजित पवारांशी चर्चा करणार
हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडावे असं मी नेहमी सांगत होतो. आज या समितीची ५ वाजता बैठक होतंय. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीला एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनाही बोलावलं आहे. यानंतर बैठकीचा अहवाल समिती मुख्यमंत्र्यांना देतील. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना काय देता येऊ शकतं, याबाबत सातत्याने संबंधित मंत्र्यांशी चर्चा करत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार आहे. हा प्रश्न चर्चेतूनच सुटू शकतो, एसटी कामगारांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन त्यांनी एसटी कामगारांना केलं.
रोजंदारीवरील कर्मचारीही संपावर आहेत. त्यांना नोटीस दिली आहे. हे एकूण १२०० ते १५०० रोजंदारी कर्मचारी आहेत. त्यांनी कामावर आलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या २८ युनियनच्या कृती समितीसोबत मी चर्चा केलीय. आणखी कुणाशी चर्चा केली पाहिजे? असा सवाल करतानाच मी कुणाशीही चर्चा करायला तयार आहे. बोलणी करायला येतात व जातात. पण ते परत येत नाहीत, असं परब यांनी सांगितलं.
मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले?, राजकारणी आहात; अनिल परबांचा टोला
आता २४ कॅरेटची शिवसेना पूर्णपणे बदलली आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मुनगंटीवार यांच्या या टीकेचा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खरपूस समाचार घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले. राजकारणी आहात. राजकारणी राहा. कॅरेटबिरेट मोजत बसू नका, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.
पडळकरांचा घणाघात
राज्यातील महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं आहे. काळ्या पायाचं हे सरकार आहे. अनेक संकटाच्या काळात या सरकारने काहीही मदत केली नाही. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्या ऐकून घ्याव्या. त्यांना काय देता येईल, काय देता येणार नाही याबाबतही चर्चा करावी. अन्यथा हेच एसटी कर्मचारी तुमचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिलाय.
परिवहन विभागाच्या सचिवांना काळे फासण्याचा इशारा
परिवहन खात्याचे सचिव हे परदेशात जातातच कसे? गेल्या सात दिवसांपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे आणि हे परिवहन सचिव परदेशात जातात. त्यांची चौकशी झाली पाहिजे. ते मंत्रालयात आले तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळे फासणार, अशी आक्रमक भूमिका पडळकर यांनी घेतलीय. तसंच परिवहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलाय. त्या पार्श्वभूमीवर उद्या प्रवीण दरेकर हे शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहेत.




