Top Newsराजकारण

गटारात तोंड बुडवून थुंकणं म्हणजे टीका नव्हे; संजय राऊतांचा पुन्हा राणेंवर हल्ला

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा दाखल देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हल्लाबोल केला. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणेंवर प्रतिहल्ला केला आहे. टीकांना आम्ही घाबरत नाही. शिवसेना पक्ष टीकांचं स्वागतच करतो. टीका बाळासाहेबांवरही व्हायची. पण आता जे चाललंय त्याला टीका नव्हे, गटारात तोंड बुडवून थुंकणं म्हणतात, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतात राऊत म्हणाले की, टीकेला कोण विरोध करतंय? टीका करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे. पण टीका करणं आणि बेताल बरळणं यात फरक आहे. सध्या जे चाललं आहे त्याला टीका म्हणत नाही. गटारात तोंड बुडवून थुंकण्याला टीका म्हणत नाहीत. असं करणाऱ्यांनी तोंड गटारात बुडतंय हे आधी लक्षात घ्यावं.

खात्याचं काम करा, शहाणपणा करू नका

संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. तुम्हाला केंद्रीय मंत्री तुमच्या खात्याचं काम करण्यासाठी केलं आहे. इथं महाराष्ट्रात येऊल बेताल वक्तव्य करण्यासाठी नव्हे. खात्याचं काम करा. जास्त शहाणपणा करण्याची गरज नाही आणि तुम्ही अंगावर येण्याची भाषा करत असाल तर ही शिवसेना आहे हे आधी लक्षात घ्या, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

आदेश देण्याचा अनिल परबांना अधिकार

नारायण राणे यांना अटक करण्यासाठी अनिल परब यांनी दबाव आणल्यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून राणेंनीही आपल्या पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला होता. याच मुद्द्यावरुन भाजप अनिल परबांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करत असल्याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी परब यांची पाठराखण केली. अनिल परब यांची कोणती क्लिप व्हायरल होतेय ते मला माहीत नाही. मी काही ती ऐकलेली नाही. पण ते तिथले पालकमंत्री आहेत. माहिती घेण्याचा आणि अधिकाऱ्यांशी बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपची खिल्ली

सूडाचं राजकारण करण्यासाठीच राणेंना अटक केली गेल्याचा आरोप भाजपाकडून होत असल्याच्या मुद्द्यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “सूडाचं राजकारण काय असतं ते भाजपानं बोलूच नये. सूडानं कारवाई करायला आमच्या हातात काही ईडी आणि सीबीआय नाही. सूडानं काय कारवाया केल्या जातायत हे मला बोलायला लावू नका. भाजप कुणावरही गुन्हा दाखल करू शकतो असा महान पक्ष आहे. ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हे दाखल करू शकतात, अशी खिल्ली राऊत यांनी उडवली.

थप्पडीचा आवाज सहा वर्षाने ऐकायला आला का?

तुम्हाला या थप्पडीचा आवाज सहा वर्षाने ऐकायला आला का? तुमच्या कानात काही तरी प्रॉब्लेम दिसतोय. आमच्याकडे कानाचे सर्जन आहेत. ज्यांना ही थप्पड सहा वर्षानंतर ऐकायला आली त्यांच्याकडे सर्जन पाठवून देण्यात येईल, असा टोला त्यांनी लगावला.

गहजब माजवण्याचे कारण नाही

खरं तर विषय संपलेला आहे. हा विषय कोर्टात प्रलंबित आहे. त्यावर काय चर्चा करायची? महाराष्ट्रात धमकी देण्याचा एक गुन्हा घडला. अशी धमकी पंतप्रधान, केंद्रीय मंत्री मुख्यमंत्र्यांना दिली जाते तेव्हा गुन्हा दाखल होतो. त्यानंतर पोलीस तपास सुरू करतात. ज्यांनी गुन्हा दाखल केला आणि अटक केली त्या पोलिसांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांना निनावी धमकीचं पत्रं आलं होतं. ते पत्रं पाठवणारे आत आहेत. सुटले नाहीत. त्यांच्याविरोएधात काय पुरावे आहेत याबाबत संभ्रम आहे. योगी आदित्यनाथ यांनाही धमकी आली तेव्हा धमकी देणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. मोदींनाही धमक्या येत असतात. त्यामुळे धरपकडी होतात. हे प्रमुख लोकं घटनात्मक पदावर असताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे यंत्रणेचं काम आहे. त्यामुळे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे मारण्याची धमकी दिली तर कितीही मोठा माणूस असेल तर कारवाई केली जाते. देशात तालिबानी पद्धतीचं राज्य नाहीये. कायद्याच्या रखवालदारांनी काही कारवाई केली असेल तर त्यात गहजब माजवण्याचं कारण नाही, असंही ते म्हणाले.

सूडबुद्धीची व्याख्या समजून घ्या

सूडबुद्धीची एकदा व्याख्या समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आमच्याविरोधात सूडाने कारवाई होत आहे. सूडाने कारवाया करायला आमच्या हातात सीबीआय ईडी नाही. या देशात कुठे आणि काय सूडाने कारवाया होतात या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका. अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक आणि देशातील अनेक लोकं यांच्याविरोधात ज्या कारवाया सुरू आहेत. त्याला सूडाच्या कारवाया म्हणतात. तुमच्याकडे तपास यंत्रणा आहेत म्हणून तुम्ही सूडाच्या कारवाया करता आणि त्या सूडाच्या कारवायांना कायदेशीर कारवाया म्हणता. महाराष्ट्र धमकीबद्दल कारवाई झाली तर ती सूडाची कारवाई? ती सूडाची असेल तर बिनबुडाची असेल. कारवाई कायदेशीर असते. जर कायदेशीर कारवाई नसेल तर ती न्यायालयात टिकत नाही. अजूनही या देशातील न्यायालये काही प्रमाणात स्वतंत्र आहेत. आणि न्यायबुद्धी स्वतंत्र बाण्याने अजूनही न्यायदान करत असते, असंही त्यांनी सांगितलं.

अग्रलेखाची जबाबदारी संजय राऊतची, रश्मी ठाकरेंची नाही !

दैनिक सामनाच्या अग्रलेखातील भाषेवरुन विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. सामनाच्या संपादक सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली असल्याची माहिती आहे. याचविषयी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘सामना’चा मी कार्यकारी संपादक आहे. त्या अग्रलेखाची जबाबदारी हा संजय राऊत घेतोय, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button