
ठाणे : ठाणे महापालिकेच्या पार्कींग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क एका प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्रीचं लसीकरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित महिलेकडे फ्रंटलाईन वर्करचं ओळखपत्र होतं. एकीककडे लसीचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक भागात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण पुढे ढकलण्यात आलं आहे, जेणेकरुन ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देता येईल. पण कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क एका अभिनेत्रीने लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित अभिनेत्रीचं नाव मीरा चोप्रा असं आहे.
मीरा चोप्राला कोविड योद्धाचे ओळखपत्र कोणत्या संस्थेने दिले आणि कशासाठी दिले हे देखील तपासावे लागणार आहे. त्यामुळे आता ओळखपत्र देणारी संस्थादेखील अडचणीत आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेचे भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.
मीरा चोप्राने लस घेतल्यानंतर स्वतःच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर लस घेतल्याची पोस्ट टाकली होती. या प्रकरणावरुन सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर मीरा चोप्रा हिने आपले फोटो काढल्याचेही दिसून आले आहे. राज्य शासनाकडून १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. तसेच ठाण्यातील सर्वसामान्यांना देखील लस घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. परंतु असे असतांना सेलेब्रिटींना पार्किंग प्लाझा येथे लस कशी मिळवली. ते वयात बसतात का? त्यांच्यासाठी लस कशी उपलब्ध करुन दिली जाते, या प्रकरणाची चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे ठाणे महापालिकेतील भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी सांगितले आहे.




