Top Newsराजकारण

मतदारांनी सारं काही झुगारून लोकशाही निवडली; फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर भाजप नेत्यांकडून राणेंचे कौतुक

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नारायण राणेंच्या पॅनेलला यश मिळाल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपच्या राज्य पातळीवरील मुख्य नेत्यांकडून नारायण राणे यांचं या विजयासाठी अभिनंदन करण्यात येत आहे. आता या निकालाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचं अभिनंदन करताना महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, हे सारे काही झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण तसेच सर्व भाजपा नेते, कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन, असे देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

फडणवीसांकडून राजन तेलींचं कौतुक आणि सल्ला

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा झटका दिला आहे. असं असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर तेली यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. याबाबत फडणवीसांनी तेली यांना सल्ला दिलाय. या विजयात राजन तेली यांचीही मोठी मेहनत होती. त्यांचा पराभव झाला असेल. मात्र, त्यांनी खचून जायचं कारण नाही. कारण समोरच्या बाजूला जे प्रत्यक्ष अध्यक्ष होते त्यांचा पराभव झालाय. आम्ही राजन तेली यांना पुन्हा सल्ला देऊ की त्यांनी पुन्हा नव्या दमानं आणि जोमानं कामाला लागलं पाहिजे, असा सल्ला फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय.

तीन चाकी रिक्षा या निवडणुकीत पंक्चर : चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या विजयासाठी नारायण राणेंचे अभिनंदन करत महाविकास आघाडीला टोला लगावला होता. ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील विजयासाठी मी नारायण राणे, राजन तेली, नितेश राणे या सर्वांचं अभिनंदन करतो. सहकारामध्ये भाजपा काहीसा मागे होता. मात्र गेल्या काही काळात ही कसर भरून निघत आहे. सिंधुदुर्गात मिळालेलं यश हे फार मोठं यश आहे. शिवसेनेला कोकणाच्या जोरावर महाराष्ट्रात राजकारण करण्याची सवय आहे. मात्र कोकणातला बेस आता सुटू लागल्याने ते हमरीतुमरीवर आले आहेत. तीन चाकी रिक्षा ही महाविकास आघाडीच्या पॅनेलची या निवडणुकीतील निशाणी होती. मात्र ही तीन चाकी रिक्षा या निवडणुकीत पंक्चर झाली, हे या निवडणुकीत दिसून आलं. आता सगळीकडेच ही तीन चाकी रिक्षा पंक्चर होणार आहे, असे भाकितही चंद्रकांत पाटील यांनी केलं.

राजन तेलींचे कष्ट वाया जाणार नाहीत : नारायण राणे

राजन तेली यांचा पराभव आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत विचारलं असता, ‘गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे राजन तेलीची आम्ही वर्णी लावणार. आम्ही त्यांचे कष्ट वाया जावू देणार नाही. आम्ही मविआच्या लोकांना जागा दाखवली आहे, असं सांगतानाच राजन तेलीचा राजीनामा वरिष्ठांकडे दिला आहे. तो निर्णय वरिष्ठ घेतील. जो निर्णय घेतली तो मान्य असेल. ही काय शिवसेना नाही’, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button