राजकारण

शिवसेनेत सुंदोपसुंदी; रामदास कदम गद्दार : माजी आमदाराचाही गंभीर आरोप

दापोली : माजी मंत्री रामदास कदम हे खोटारडे असून, स्वार्थासाठी त्यांनी पक्षाशी अनेकवेळा गद्दारी केली आहे. माझ्या बाबतीत सुद्धा त्यांनी असेच केले होते, असा खळबळजनक आरोप दापोलीतील शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला आहे. व्हायरल ऑडियो क्लिप प्रकरणात आता दळवी यांनीही उडी घेतली आहे.

क्लीपशी माझा काहीही सबंध नाही, या कदम यांच्या खुलाशावर दळवी यांनी भाष्य केले आहे. कदम यांच्या यांच्या वक्तव्यानंतर स्थानिक पातळीवर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी कदम यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

दरम्यान, भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सातत्याने आरोप करून सोमय्यांनी त्यांना वारंवार अडचणीत आले आहे. परब यांच्यावर तुटून पडलेल्या सोमय्यांना शिवसेनेच्याच बड्या नेत्याचा रस पुरवल्याचा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याशिवाय, मनसेच्या नेत्याने सोमय्या आणि कदम यांच्या ऑडिओ क्लिपदेखील समोर आणल्या आहेत.

प्रसाद कर्वे नावाचा एक माहिती अधिकार कार्यकर्ता परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता सगळ्या अपडेट्स शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. संजय कदम यांचे आरोप रामदास कदम यांनी फेटाळले आहेत.

मनसेच्या वैभव खेडेकरांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही, असे म्हणत कदमांनी आरोप फेटाळून लावले. माझ्या मुलाविरुद्ध विधानसभा निवडणुकीत संजय कदम पराभूत झाले. तेव्हापासून ते सातत्याने माझ्यावर आरोप करत आहेत. वैभव खेडेकरांच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी ते असे आरोप करतात. मी आधीच त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि आता पुन्हा मानहानीचा दावा करणार आहे, असे कदम म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button