कोरोनाचे सर्व रेकॉर्ड मोडीत; राज्यात २४ तासांत २७ हजारांवर रुग्ण
मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. शनिवारी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी (19 मार्च) कोरोना रुग्णसंख्येने 25 हजारांचा टप्पा पार केला होता. त्यात गेल्या 24 तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने 27 हजारांचा टप्पा पार केला आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 24 तासांतील आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचं सांगितलं जात आहे.
आज राज्यातून 13588 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण 22,03,553 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.97 % एवढे झाले आहे. आज राज्यात 27,126 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 92 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.18 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,४९,१४७ (१३.४४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,१८,४०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण १,९१,००६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दुसरीकडे विदर्भ आणि पुणे जिल्ह्यातही कालपेक्षा आज कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात 24 तासात 3111 पाझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून दिवसभरात 1094 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाबाधीत २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून 5 रुग्ण पुण्याबाहेरील आहे. दुसरीकडे 538 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.