Top Newsआरोग्य

आजपासून चार स्तरांतील जिल्ह्यांत ई-पासशिवाय एस.टी. प्रवासास मुभा

मुंबई: काही जिल्ह्य़ात आज (सोमवार) पासून निर्बंध शिथिल होत असल्याने एसटीची सेवा पूर्ववत होत आहे. त्यामुळे एसटीने एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ातही जाता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली. राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी करतानाच कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. यात पहिल्या चारही स्तरांत मोडणाऱ्या जिल्ह्य़ात प्रवास ई-पासशिवाय करता येणार आहे.

दुसरी लाट सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या ओसरू लागली. त्यातच टाळेबंदीचे नियम कठोर करतानाच प्रवासावरही निर्बंध आले. एसटीची जिल्हा ते जिल्हा सेवा बंदच राहिली. तर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी एसटी चालवण्यात आल्या. परिणामी एसटीची प्रवासी संख्या व उत्पन्न कमी झाले. सध्या राज्यात एसटीतून दररोज १० हजारच प्रवासी प्रवास करू लागले आणि ३० ते ४० लाख रुपये उत्पन्न मिळू लागले. आजपासून राज्यातील निर्बंध शिथिल होत असल्याने एसटी महामंडळाला काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी करताना पहिल्या स्तरातील नागपूर, अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, यवतमाळमध्ये सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. दुसऱ्या स्तरातील हिंगोली, नंदुरबारमध्येही निर्बंध शिथिल केले आहेत. तिसऱ्या व चौथ्या स्तरातील जिल्ह्य़ात ५० टक्के क्षमतेने वाहतूक सुरू राहील. या चारही स्तरांत जिल्हा ते जिल्हा प्रवासही करता येणार आहे. पाचव्या स्तरात मोडणाऱ्या जिल्ह्य़ात निर्बंध कठोर असल्याने अन्य जिल्ह्य़ातून येणाऱ्यांना ई-पास बंधनकारक असणार आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे एसटीच्या लांब पल्ल्याच्या व मध्यम पल्ल्याच्या गाडय़ांचे ऑनलाइन आरक्षणही सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू होईल. तोपर्यंत आगारात लांब पल्ल्याची एसटी उपलब्ध असल्यास गाडीतच प्रवाशांना वाहकाकडून तिकीट मिळेल. प्रवाशांची मागणी व गर्दी पाहूनच एसटी बसगाडय़ांचे नियोजन के ले जाणार असून सरसकट सर्वच गाडय़ा सोडल्या जाणार नाहीत असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button