लखनऊ : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचं राजकारण मंगळवारपासून जबरदस्त रंगात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्या स्वामी प्रसाद मौर्यांसोबत आणखी तिघांनीही आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकारण तापलं होतं. अशातच आता काल राजीनामा आणि आज स्वामी प्रसाद मौर्या यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दरम्यान, ज्या प्रकरणी स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे, ते प्रकरण आहे तब्बल आठ वर्ष जुनं!
उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्या यांनी भाजपला सोडचिट्ठी देत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात सामील होतील, अशीही शक्यता होती. अजून त्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश झालेला नाही. अशातच आता त्यांच्याविरोधात निघालेल्या अटक वॉरंटनं राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. स्वामी प्रसाद मौर्या यांच्याविरोधात जे अटक वॉरंट काढण्यात आलं आहे, ते आहे २०१४ साली झालेल्या एका प्रकरणातलं. देवी-देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी स्वामी प्रसाद मौर्या हे अपर मुख्य दंडाधिकाऱ्यांसमोर आज (बुधवारी) हजर होणं अपेक्षित होतं. मात्र ते हजर न झाल्यामुळे त्यांच्याविरोधात एमपी-एमएलए कोर्टानं अटक वॉरंट जारी केलंय. सुल्तानपूर कोर्टानं त्यांनी २४ जानेवारीपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, हे काही पहिलं वॉरंट स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात निघालेलं नाही. याआधीच त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. ज्यावर स्वामी प्रसाद मौर्य यांनी २०१५ पासूनच स्टे घेतला होता. सहा जानेवारी रोजी कोर्टानं स्वामी प्रसाद मौर्य यांना १२ जानेवारीला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. ते न पाळल्यामुळे आता जुनंच वॉरंट पुन्हा जारी करण्यात आलं आहे.
दरम्यान, भाजप सोडल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य हे लवकरच अखिलेश यादव यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. येत्या १४ किंवा १५ तारखेला याबाबत आपला निर्णय ते जाहीर करतील, अशी शक्यता आहे. मंगळवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देताना भाजपवर गंभीर आरोप केले होते. दलित ,मागास, युवा आणि बेरोजगारांची योगी आदित्यनाथ सरकारनं उपेक्षा केल्याची टीका त्यांनी केली होती.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या नंदर बिल्होर, बांदा आणि शाहजहापूरच्या भाजप आमदारांनीही आपला राजीनामा दिला आहे. भगवती सागर, वृजेश प्रतापती आणि रोशन लाल यांच्या राजीनाम्यानं उत्तर प्रदेश भाजपमध्ये सगळंकाही आलबेल नाही, हेही स्पष्ट झालंय. तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड असून याचे दूरगामी परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.