‘कोरोना क्विल्ट प्रोजेक्ट’ला ‘गोदरेज’चे समर्थन
मुंबई : ‘कोरोना क्विल्ट प्रोजेक्ट’च्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी काही विशिष्ट कलाकृती उभारण्यात आल्या आहेत. कोरोना साथीचा उद्रेक झाल्याच्या सुरुवातीच्या दिवसांत लोकांशी संपर्क साधणे, तसेच आत्म-अभिव्यक्तीवर व मानसिक आरोग्यावर चर्चा करणे आणि विविध समुदायांना एकत्र आणणे यांसाठीचा एक मार्ग म्हणून ‘कोरोना क्विल्ट प्रोजेक्ट’ सुरू करण्यात आला.
‘क्विल्टिंग’ ही कोणत्याही सामग्रीचे थर एकत्र जोडण्याची एक पद्धत आहे. कापडाच्या तुकड्यांची गोधडी शिवण्यासारखा हा प्रकार असतो. या गोधडी शिवण्याचा इतिहास मध्ययुगीन काळापर्यंत शोधला जाऊ शकतो. या विशिष्ट प्रकल्पासाठी, आम्ही ‘क्विल्टिंग’ची नवी पद्धत वापरली आहे – यातील प्रत्येक पॅच हा जुने वापरलेले कपडे, पोती, टेबलक्लॉथ आणि कागद अशा अनोख्या वस्तूंपासून बनविण्यात आला आहे. हा प्रत्येक ‘पॅच’ हा व्हर्च्युअली चौकोनी असावा, यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहन दिले; जेणेकरून टाळेबंदीतील निर्बंधांशी ती रचना सुसंगत होईल. अनेक ठिकाणांहून आलेल्या या कलाकृतींमध्ये संबंधित व्यक्तींचा व्यक्तिगत प्रवास दर्शविण्यात आला आहे. ‘अपसायकल्ड फॅब्रिक्स’वर हे सर्व छापले जात असून अंतिम सादरीकरणाचा तो एक भाग असेल.
हा वर्षभर चालणारा सार्वजनिक उपक्रम पाच वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. मुंबई / हैदराबाद येथे स्थित असलेल्या एक कलावंत, दिया मेहता भूपाल यांच्या “राईज” या उभारणीतून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते, मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग व बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या उपस्थितीत झाले.
हे उद्घाटन आणि ‘कोरोना क्विल्ट प्रोजेक्ट’ यांविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण वरळी सीफेस व हाजी अलीजवळून जात असताना, आपल्याला वरळी सीफेस स्कूल आणि हाजी अली पंपिंग स्टेशनवर सुंदर ‘क्विल्ट’ पाहावयास मिळतात. यातील हाजी अली पंपिंग स्टेशनवरील ‘क्विल्ट’मध्ये मुंबई पोलिस व बीएमसी यांच्या कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत. कोविडविरुद्धच्या लढ्यात आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी हे कर्मचारी अग्रभागी आहेत. ‘वरळी सीफेस स्कूल’वरील ‘क्विल्ट’मध्ये आशा आणि उदय अशी संकल्पना आहे. ‘कोरोना क्विल्ट प्रोजेक्ट’ ही एक आशादायी बाब आहे, असे दर्शवत जगभरातील लोकांनी आपल्या विचारांचा एक सुंदर कोलाज या फॅब्रिकवर मांडला आहे. या सुंदर कला प्रदर्शनाबद्दल आणि या उपक्रमाचा एक भाग होण्याबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे.”
या प्रकल्पात सहभागी होण्याबाबत ‘गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या ‘गूड अॅंड ग्रीन’च्या असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट गायत्री दिवेचा म्हणाल्या, “हे वर्ष यापूर्वी कधीही नव्हते अशा बिकट स्वरुपात गेले. कोरोना साथीशी आपण लढत असताना, आपल्याला व्यक्ती, व्यवसाय आणि एक गट म्हणून आकार देणाऱ्या अनेक कथा व अनुभव आपल्याकडे आहेत. ‘कोरोना क्विल्ट प्रोजेक्ट’शी संबंधित असण्यामुळे, गोदरेज कुटुंब या नात्याने आपण इतिहासातील या अनोख्या काळात आपली दृष्य चिन्हे उभारू शकत आहोत. ‘गोदरेज’च्या 200 हून अधिक कर्मचार्यांनी आपले विचार, आपली भीती, आशा, अनुभव आणि कथा या डिजिटल स्क्वेअरवर रचून भाग घेतला. आमच्या आठवणी या आता इतर हजारो जणांबरोबर संपूर्ण मुंबईत सार्वजनिकपणे प्रदर्शित केल्या जातील. या नंतर, आम्ही विक्रोळी येथील आमचे मुख्यालय – ‘गोदरेज वन’, येथे ही कलाकृती प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पाचा एक भाग असल्याचा आम्हाला आनंद आहे. आपल्या समाजाशी नाविन्यपूर्ण मार्गाने जोडून आपले सामर्थ्य दर्शविणारा व प्रेरणा देणारा हा प्रकल्प आहे.”
‘कोरोना क्विल्ट प्रोजेक्ट’मधून विविधतेचे अनेक अनुभव सादर केले जात आहेत, तसेच लोकांचे सामर्थ्य आणि खंबीरपणा या गोष्टींचे कौतुकही यात व्यक्त होत आहे. घर, सुरक्षा, निसर्ग, सभोवतालचे वातावरण आणि कोरोनाचा उद्रेक या सर्व गोष्टींची संकल्पना माध्यम व साहित्याच्या अनन्य प्रकारांद्वारे या क्विल्टच्या प्रत्येक चौरसात व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईच्या चैतन्यातून हा प्रकल्प प्रेरणा घेतो आणि या चैतन्याचा अनुभव घेणाऱ्यांबरोबर त्यातील आनंद व प्रेरणा मिळविण्याचा प्रयत्न करतो.
“या चळवळीने निरनिराळी शहरे व देशांतील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना जोडले आहे – आपले वय, लिंग, व्यवसाय किंवा राष्ट्रीयत्व काहीही असो, आपण सर्वांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना केला आहे, या विश्वासाचा हा प्रतिध्वनी आहे. या सादरीकरणांतून आपण सर्वजण पुढे जात आहोत, बरे होत आहोत आणि आपला एक प्रकारे पुनर्जन्मही होत आहे. वरळी-पेडर रोड जंक्शनवरील सादरीकरणाचे स्थान हे विशेष उत्साहवर्धक आहे. मुंबईतील अति-रहदारीच्या भागांना जोडणाऱ्या ठिकाणी ही सादरीकरणे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे ती लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत आहेत व अतिशय दृश्यमान ठरत आहेत,” असे प्रतिपादन या प्रकल्पाच्या सह-संस्थापिका नेहा मोदी यांनी केले.
भूपाल यांच्या सादरीकरणात महासागर, फुलपाखरे यांसारख्या नैसर्गिक घटकांमध्ये एकत्रितपणे येणारा एक परिवर्तनीय आणि उन्नत प्रवास समाविष्ट आहे. तसेच कोरोना साथीविरूद्ध लढा देण्याचे काम करणाऱ्या अग्रस्थानावरील कर्मचार्यांची छायाचित्रेही त्यांत आहेत. यात संकलित केलेल्या चौरसांमध्ये खोली, वैविध्य आणि कलात्मकता यांची संपूर्ण श्रेणी सादर करण्याचा कलाकाराचा हेतू दिसून येतो.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अग्रभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणून, हाजी अली पंपिंग स्टेशनच्या दर्शनी भागावर “वॉरियर्स राइज” हे पोर्ट्रेट्सचे एक ‘मोन्ताज’ उभारले जाणार आहे. यामध्ये ‘स्पंदन पावणारे हृदय’ या कल्पनेवर भर देण्यात आला आहे. आपणा सर्वांना सुरक्षित व आरोग्यदायी ठेवणाऱ्या सर्व कामगारांचे ते प्रतीक आहे. यामध्ये कोरोना साथीच्या काळात आपल्याला ताकद व आधार देणारे डॉक्टर, परिचारिका, पोलिस दल आणि ‘बॉम्बे म्युनिसिपालिटी कम्युनिटी’चे (बीएमसी) सदस्य यांचे वैयक्तिक पोर्ट्रेट्स आहेत.
वरळी सीफेसवरील “ऑन द राइझ” हे सादरीकरण इमारतीच्या दर्शनी भागाभोवती गुंडाळलेले आहे. यामध्ये 5 हजारहून अधिक व्यक्तींची वैयक्तिक आख्याने एकत्र मांडण्यात आली आहेत. परिवर्तन, उत्क्रांती व पुनरुत्थान यांचे प्रतीक म्हणून फुलपाखरू यात रंगविण्यात आले आहे. हा एक महत्वाचा आणि हेतूपूर्ण रूपांतर करण्याचा काळ आहे आणि यामध्ये नवीन दृष्टीकोन आणि दृष्टांत यांची निर्मिती करण्यात आली आहे.
“मुलांची रेखाचित्रे व त्यांचा निरागसपणा यांतून माझ्या सादरीकरणांना प्रेरणा मिळाली. राईजमध्ये मानव आणि निसर्ग यांच्यातील कृत्रिम व नैसर्गिक, पूर्वीचे व आताचे सातत्य आणि एकता यांचे रेखाटन करण्यात आले आहे. आपले सध्याचे वास्तव आणि कोरोना साथीचे परिणाम यांच्यावर आधारीत संकल्पना यात निवडण्यात आल्या आहेत. संपूर्ण समाजाला जोडणाऱ्या, एकत्रितपणे समर्थ बनविणाऱ्या वैयक्तिक कथांवर काम करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी आभारी आहे,” असे दिया मेहता भूपाल यांनी नमूद केले.
‘कोरोना क्विल्ट प्रोजेक्ट’ जून 2020 मध्ये सुरू झाला. या प्रकल्पासाठी कॉर्पोरेट क्षेत्र, शाळा, स्वयंसेवी संस्था, फाउंडेशन्स, व्यक्ती आणि इतर यांच्याकडून 12 हजारांहून अधिक चौरस प्राप्त झाले आहेत.
पाठिंबा देणाऱ्या संस्था
आयआयएफएल, गोदरेज समूह, जेएसडब्ल्यू, बॉम्बे शर्ट कंपनी, बॉम्बे म्युनिसिपालिटी कम्युनिटी (बीएमसी) यांच्या उदार प्रायोजकत्वामुळे ‘कोरोना क्विल्ट प्रोजेक्ट’ची उभारणी शक्य झाली आहे.
सहभागी संस्था
विप्रो, आरपीजी आर्ट फाउंडेशन, टीच फॉर इंडिया, फिक्की, प्राइड इंडिया, ड्रीम गर्ल्स फाऊंडेशन, बिर्ला ओपन माइंड्स, कॅथेड्रल स्कूल, गेटवे स्कूल, परिक्रमा, करो, एसआरसीसी आणि इतर अनेक. याव्यतिरिक्त, श्रेयस अय्यर, सानिया मिर्झा, राम चरण, महेश बाबू, राणा डग्गुबाती, सामन्था प्रभू, ट्विंकल खन्ना, रकुलप्रीत सिंग आणि नीतू कपूर यांसारख्या नामांकित कलाकारांनी आपल्या कथा शेअर केल्या आहेत.