आरोग्य

देशात फक्त ५ दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा

लस संपण्याच्या भीतीने मुंबईकरांची कोव्हिड सेंटरवर तोबा गर्दी

मुंबई: महाराष्ट्राला तातडीने कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने केराची टोपली दाखवल्यानंतर आता मुंबईकरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोरोना लसींचा साठा संपत आल्यामुळे मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, देशात अजूनही कोरोनाचं संकट घोंघावत आहे. या संकटावर मात करण्यासाठी सुरुवातीपासून सरकार प्रयत्न करत आहे. जानेवारीपासून कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरण मोहीम सुरुवात झाली. पण फेब्रुवारी महिन्यात अचानक कोरोनाचा कहर सुरू झाला. यामुळे लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. देशात एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा साडे पाच दिवस पुरेल इतकाच आहे, असे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. त्यात अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा भासत असून काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक राज्यांची कोरोना लसीच्या साठ्याची मागणी केंद्राकडे केली आहे. पण आता लसीचा तुटवडा भासत असल्यामुळे देशाची चिंता वाढताना दिसत आहे.

लस संपण्याच्या भीतीपोटी शुक्रवारी मुलुंडच्या जम्बो कोव्हिड सेंटरवर नागरिकांनी लस घेण्यासाठी तोबा गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे याठिकाणी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. लसीचा साठा संपल्यास आपल्याला लस मिळणार नाही, या भीतीने नागरिकांनी या केंद्रावर धाव घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, याठिकाणी असणारे कोरोना लसीचे डोस संपत असल्याने मोजक्याच नागरिकांना आतमध्ये घेण्यात आले आहे. परिणामी इतर नागरिकांची गैरसोय झाली आहे. मुलूंडच्या कोव्हिड सेंटरवर सध्या सोमवारपर्यंत कोणतेही लसीकरण होणार नाही, अशी उद्घोषणा केली जात आहे. त्यामुळे हताश होऊन घरी पतरण्याशिवाय नागरिकांकडे कोणताही पर्याय उरलेला नाही.

बीकेसीसह मुंबईतील 26 लसीकरण केंद्र बंद

मुंबईसह राज्यात कोरोनाच संसर्ग वाढलेला असतानाच कोरोना लसीचा तुटवडाही भासत आहे. मुंबईतील 72 पैकी 26 खासगी व्हॅक्सीनसेंटरमधील लस संपल्याने या 26 ठिकाणचं लसीकरण बंद करण्यात आलं आहे. मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमध्येही लस संपल्याने या ठिकाणचंही लसीकरण बंद करण्यात आलं आहे.

राज्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढ्याच लसी आहेत. मुंबईत लसीचा तुटवडा प्रचंड प्रमाणात निर्माण झाल्याने खासगी लसीकरण केंद्रांवरील लस देणं बंद करण्यात आलं आहे. मुंबईत एकूण 120 लसीकरण केंद्र आहेत. त्यापैीक 49 लसीकरण केंद्रे शासकीय आहेत. या केंद्रावर रोज 40 हजार ते 50 हजार लस दिल्या जातात. बुधवारी राज्यात 14 लाख डोस होत्या. अनेक जिल्ह्यात आज किंवा उद्या कोरोना लसीचा साठा संपेल. केंद्राला याबाबतची माहिती लिखित स्वरुपात दिली असल्याचं आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितलं.

देशातही लसीचा साठा संपण्याच्या मार्गावर

आंध्रप्रदेश आणि बिहार सारख्या काही राज्यांमध्ये फक्त दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उपलब्ध आहे. महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये चार दिवस लस देण्याइतकाच लसीचा साठा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच नाहीतर इतर राज्यांमध्ये देखील कोरोनाचा तुटवडा अधिक जाणवत आहे. अशा परिस्थितीत देशात फक्त पाच दिवस कोरोना लसीचा साठा असल्याचे समोर आले आहे.

देशात कोरोना रुग्णांची वाढ संख्या पाहून लसीकरणावर अधिक भर देण्यात आला. एप्रिल महिन्यांमध्ये दररोज सरासरी ३६ लाख लस दिल्या जात आहेत. त्यामुळे सध्या भारताकडे फक्त दोन कोटी लशींचा साठा उपलब्ध आहे. हा दोन कोटी लसींचा साठा फक्त साडे पाच दिवस पुरतील एवढाच आहे. दर चार ते आठ दिवसांनी राज्यांना लसीचा साठा पुरवला जात आहे. पुढील आठवड्यामध्ये २ कोटी ४५ लाख लसीचा साठा पुरवला जाईल. त्यात अमेरिका आणि युरोपने लस विकसित करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल रोखल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती सीरम इन्स्टिट्यूचे सीईओ अदर पुनावालांनी दिली आहे. त्यामुळे आणखीच देशाची चिंता वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढ असल्यामुळे एका दिवसात देशात सर्वाधिक ३.९ लाख लोकांना लस दिली आहे. देशातील लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. पण सध्या महाराष्ट्राकडे १५ लाख लसीचा साठा असून फक्त ४ दिवस पुरण्याची शक्यता आहे. तसेच आंध्र प्रदेशात फक्त १.४ लाख डोस शिल्लक असून १ ते २ दिवसांत संपण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात दैनंदिन सरासरी १.१ लाख जणांचे लसीकरण पार पडते. बिहामध्ये आता एकूण २.६ लाख डोस असून तिथे दरोरज १.७ लाख लोकांना लस दिली जाते. जरी या राज्यांमध्ये लसीचा तुटवडा भासत असला तरी तामिळनाडूमध्ये चांगली परिस्थिती आहे. तामिळनाडूत सध्या १७ लाख लसीचा साठा शिल्लक असून येथे दररोज फक्त ३७ लाख लसीचे डोस दिले जातात. सध्या मध्य प्रदेशात (३.५ दिवस), उत्तराखंड (२.९ दिवस), उत्तर प्रदेशात (२.५ दिवस), ओडिशामध्ये (३.२ दिवस) इतके दिवस या राज्यांमध्ये कोरोना लसीचा साठा शिल्लक आहे. पण अशा परिस्थिती येत्या ११ एप्रिल आणि १४ एप्रिलला लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यामुळे ज्या राज्यांमध्ये लसीचा तुटवडा भासत आहेत, तिथे लसीकरण उत्सव कसा साजरा केला जाणार? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button