ब्लॅक फंगसचे थैमान; चिंता वाढली !

मुंबई : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा २,९७,६२,७९३ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६२,४८० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,५८७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल ३,८३,४९० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशात कहर पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत.
काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर उपचार केले जात असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई ब्लॅक फंगसमुळे तीन मुलांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे डोळे काढण्यात आले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांमधील म्युकोरमायकोसिसचे किंवा ब्लॅक फंगसची प्रकरणे चिंताजनक आहेत. कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात हा संसर्ग आढळून आला आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयात ४, ६ आणि १४ वर्षांवरील मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यातील पहिल्या दोन मुलांना मधुमेह नाही, परंतु १४ वर्षांच्या मुलाला मधुमेह झाल्याची माहिती मिळत आहे.
खासगी रुग्णालयातील डॉ. जेसल शेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनीच्या दुसर्या लाटेत मधुमेह असलेल्या दोन जणांना ब्लॅक फंगसचा संसर्ग झाल्याचं आम्ही पाहिलं. यातील १४ वर्षांची मुलगी आमच्याकडे आल्यानंतर ४८ तासांमध्ये तिचा एक डोळा काळा पडला. मुलीला मधुमेह देखील झाला आहे. डॉक्टरांनी हा संसर्ग नाकामध्येही पसरत होता मात्र सुदैवाने तो मेंदूपर्यंत पोहोचला नाही. या मुलीवर सहा आठवड्यांपर्यंत उपचार सुरू होते, दुर्दैवाने तिला डोळा गमवावा लागला. ब्लॅक फंगसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी वापरण्यात आलेल्या इंजेक्शनचा वाईट परिणाम होत असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जवळपास २७ रुग्णांना अँफोटेरिसिन-बी (Amphotericin-B) इंजेक्शन दिल्यानंतर याचे गंभीर दुष्परिमाण दिसू लागले आहेत. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळे याचा वापर थांबवण्यात आला आहे.
मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. जवळपास ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या उपचारासाठी दोन दिवसांपूर्वीच जवळपास ३५० अँफोटेरिसिन-बी इंजेक्शन पाठवण्यात आले. ब्लॅक फंगस रुग्णांमध्ये अँम्फोटेरिसीन बी इंजेक्शनचे भयंकर असे दुष्परिणाम दिसून आले आहेत. हे इंजेक्शन दिल्यानंतर थंडी, ताप, उलटीची समस्या उद्भवू लागली. इंदोर, सागर आणि जबपूरमध्ये इंजेक्शनचे असे गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत. ४२ पैकी २७ रुग्णांना शनिवारी अँफोटेरिसिन-बी इंजेक्शन देण्यात आलं. मात्र त्यानंतर गंभीर दुष्परिणाम दिसून आला आहे. काहींना खूप ताप आला. तसेच त्यांचे अंग थरथर कापू लागले. अचानक थंडी वाजू लागली आणि उलट्या देखील झाल्या आहेत.
रुग्णांवर या इंजेक्शनचा दुष्परिणाम दिसून येताच हे औषध देणं थांबवण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की रुग्णांवर इंजेक्शनचं रिअॅक्शन दिसून येत आहे. आता त्यांना इंजेक्शनऐवजी दुसरं औषध दिलं जात आहे अशी माहिती दिली. “म्यूकोरमायसिस” हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत.




