Top Newsअर्थ-उद्योगफोकस

‘इंडियाबुल्स फायनान्स सेंटरमध्ये ईडी’चे छापे

मुंबई : अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने मुंबईतील इंडियाबुल्स फायनान्स सेंटर येथे काही कार्यालयात छापेमारी केली आहे. ईडी दिल्ली आणि मुंबई यांच्या संयुक्त मोहिमेतून ही छापेमारी सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. प्राथमिक माहितीच्या आधारावर ही छापेमारी सुरू आहे. पीएमएलए (पीएमएलए) कायदा २००२ अंतर्गत ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे.

इंडियाबुल्स हाऊसिंगचे प्रमोटर समीर गेहलोत यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या निमित्ताने ही छापेमारी सुरू आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. याआधीच्या २०१४ आणि २०२० मध्ये झालेल्या पैशांच्या हेराफेरीच्या प्रकरणातील गुन्ह्यांच्या अहवालावर आधारीत ही छापेमारी करण्यात आल्याचे कळते. हेराफेरी आणि ऑडिटमधील अनियमिततेच्या प्रकरणात इंडियाबुल्स समूहाच्या कंपन्यांच्या विरोधात एप्रिल २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या कंपनीचाही समावेश आहे. दिल्ली आणि मुंबईच्या ईडीच्या टीमने संयुक्त अशा पद्धतीने या प्रकरणात छापेमारी केली आहे.

पालघरमध्ये नोंदवण्यात आलेल्या एका तक्रारीच्या आधारावर ही छापेमारीची कारवाई करण्यात आली असल्याचे कळते. कंपनीने पैशाची हेराफेरी करतानाच वाढीव किंमतीसाठी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. प्राथमिक स्वरूपातील तक्रारीमध्ये तक्रारदाराने रियल इस्टेट कंपन्यांचाही उल्लेख केला होता. या कंपन्यांनी इंडियाबुल्सकडून कर्ज घेतले होते. पण कर्जाची रक्कम ही इंडियाबुल्स हाऊसिंगच्या शेअर्समध्ये पाठवण्यात आली होती.

ईडीने आणि नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (एनआयए) ने याआधी गेल्याच आठवड्यात मुंबईत दहा ठिकाणी छापे मारले होते. त्यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तांच्या ठिकाणी ही छापेमारी झाली होती. दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या घरी ईडीच्या टीमने छापा टाकला होता. मनी लॉंड्रिंग प्रकरणात ही छापेमारी झाली होती. त्यामध्ये काही राजकीय नेत्यांचेही कनेक्शन असल्याचे बोलले जात होते. ईडीने गॅंगस्टर छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुट यालाही ताब्यात घेतले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button