नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला. त्यानुसार, आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले. मलिक यांच्या आरोपाला फडणवीस यांनी ट्विट करुन एका वाक्यात उत्तर दिलं. मात्र, पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारल्यावरही थोडकीच प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांच्या हायड्रोजन बॉम्बसंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, मला वाटतं मी केलेलं ट्विट पुरेसं बोलकं आहे, आशिष शेलार यांची प्रतिक्रियाही पुरेशी बोलकी आहे. यापेक्षा जास्त त्याला काही वजनही नाहीये, मग त्याला कशाला जास्त वजन देताय, असेही फडणवीस यांनी म्हटले. तसेच, फडणवीसांनी मलिक यांची हसत हसत खिल्लीही उडवली. दरम्यान, सकाळीच फडणवी यांनी ट्विट करुनही टोला लगावला होता. ‘खूप पूर्वीच एक गोष्ट शिकलोय, डुकराशी कधीही कुस्ती करू नका. कारण, तुम्ही गलिच्छ व्हाल आणि डुकराला तेच आवडेल,’ अशा आशयाचे ट्विटही फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, पण नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी हे ट्विट केलंय. त्यामुळे, त्यांच्या या ट्विटचा टोला स्पष्टपणे नवाब मलिक यांच्याकडेच इशारा करत असल्याचे दिसून येते.