
सांगली: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्त जनतेशी संवाद साधल्यानंत अजित पवार सांगलीत पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांनी सांगलीत बोलताना आता बरेच जण दौरे करत आहेत, केंद्र सरकारचे मंत्री येत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही आता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणार आहोत. नोडल अधिकारी मंत्र्यांच्या दौऱ्यासोबत असतील, अशी माहिती दिली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी हे दालनात बसूनच आता मदती संदर्भात काम करतील, असं अजित पवार म्हणाले. अधिकाऱ्यांना हे कुठे, ते कुठे चालणार नाही, अधिकाऱ्यांना सुद्धा मदतीसाठी वेळ हवा आहे, असे अजित पवार म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित नसल्यानं संताप व्यक्त केला होता.
नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा. समोर जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ संबंधित ठिकाणी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा, असंही नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं होतं.