राजकारण

मुंबई पोलिसांकडून हैदराबादेतील निवासस्थानी रश्मी शुक्लांचा जबाब

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी अखेर वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला. हैदराबादमधील घरी जाऊन मुंबई पोलिसांच्या पाच अधिकाऱ्यांच्या टीमने शुक्लांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. जबाबात फोन टॅपिंग प्रकरणात एफआयआरमध्ये लावले गेलेले आरोप शुक्ला यांनी फेटाळले. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत.

ऑफिशिअल सिक्रेटस अ‍ॅक्ट १९२३ अंतर्गत दाखल एफआयआर प्रकरणी मागील आठवड्यात रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद निवासस्थानी जबाब नोंदवला गेला. पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांची टीम तांत्रिक पुरावे गोळा करत आहे. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. राज्य गुप्तचर विभागाचा गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसात गुन्हा दाखल असून त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीला हजर राहण्यासाठी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र, रश्मी शुक्ला यांनी कोरोना परिस्थितीचे कारण देत मुंबईत येण्यास नकार दिला होता. इतकीच गरज असेल तर मला प्रश्न पाठवा, मी उत्तर देते, असेही शुक्ला यांनी कळवले होते. मात्र, त्यानंतरही मुंबई पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले होते.

रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात उच्च न्यायालयातही तक्रार दाखल केली होती. चौकशी अधिकारी छळ करत असल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांनी याचिकेत केला होता. याचिकेत राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि एसपी सायबर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button