Top Newsराजकारण

साडे आठ टक्क्यांनी बेरोजगारी वाढली, जबाबदार कोण? राष्ट्रवादीचा मोदींना सवाल

मुंबई : सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने देशाचा बेरोजगारीचा आकडा नुकताच प्रसिद्ध केलाय. सुमारे साडे आठ टक्क्यांनी बेरोजगारी वाढली आहे, हा धक्कादायक आकडा आहे. ऑगस्ट महिन्यात साडेपंधरा लाख लोकांचा रोजगार गेला आहे, याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला मोदी सरकारला केलाय. सुरुवातीपासूनच केंद्रातील मोदी सरकारचं धोरण लोकांना रोजगार मिळण्यास अनुकुल राहिलेले नाही. केंद्रसरकारने नोटबंदी केली, जीएसटी करप्रणाली आणली आणि उद्योगधंद्याना जी चालना मिळायला हवी होती ती मिळाली नाही. त्याचा परिणाम देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे. दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असं सांगणारं मोदींचं सरकार रोजगार देण्यात अपयशी ठरले आहे. शिवाय लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही सोडवू शकली नाही, हे वास्तव समोर आलं आहे, असंही महेश तपासे म्हणाले.

सीएमआयईचा अहवाल काय सांगतो?

सीएमआयईच्या रिपोर्टनुसार ऑगस्ट महिन्यात बेरोजगारीचा दर वाढून ८.३२ टक्के झालाय. तर जुलैमध्ये हा दर ६.९५ टक्के इतका होता. बेरोजगारीचा दर पाहायचा झाला तर ऑगस्टमध्ये शहरी बेरोजगारीचा दर जवळपास १.५ टक्क्यांनी वाढून ९.७८ टक्के झालाय. जुलै महिन्यात देशातील शहरी बेरोजगारी दर ८.३ टक्के होता. तर याप्रमाणेच ग्रामीण बेरोजगारी दरही ऑगस्टमध्ये १.३ टक्क्यांनी वाढून ७.६४ टक्के झाला आहे. जुलैमध्ये हा दर ६.३४ टक्के होता.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनुसार काम करणाऱ्या लोकांची संख्या जुलै महिन्यात ३९.९३ कोटीवरुन घसरून ऑगस्टमध्ये ३९.७७ कोटी झाली आहे. या दरम्यान ग्रामीण भागात जवळपास १३ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button