मुक्तपीठ

कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली !

मुकुंद परदेशी (संपर्क ७८७५० ७७७२८)

कमलाताई बरळीकर आपला वरळीच्या कार्यकर्त्यांचा ‘काय करता आता !’ मेळावा संपवून निवांत बसल्या आहेत. कार्यकर्ते आणि पत्रकारांसमोर धारण केलेला वाघिणीचा मुखवटा आता गळून पडला आहे. आपण नक्की कोण, महाराष्ट्राची वाघीण की पंख छाटलेली पक्षीण? बोलतांना आपण आपल्या कार्यकर्त्यांना बोललो की, माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात. कोणी सभापती आहे, तर कोणी अध्यक्ष आहे. असं बोलतांना आपल्याला मनातून यातना का होत होत्या? आपल्या कार्यकर्त्यांना आपणच द्यायला लावलेले राजीनामे आपणच फेटाळून लावत असल्याची घोषणा करताच त्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू एखादया वाहिनीच्या कॅमेऱ्याने टिपलं तर नसेल, त्यावर एखादा ‘स्पेशल रिपोर्ट’ तर दाखवला जाणार नाही ना ? उद्या जर कार्यकर्त्यांच्या दबावात आपल्याला असाच पक्षाचा राजीनामा द्यावा लागला, तर कोणी तो असाच फेटाळून लावेल की नाही ? अशा एक ना अनेक प्रश्नांनी ताईंच्या डोक्यात काहूर माजवलं. त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले.त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर एक जखमी वाघीण कोणावर तरी झेपावण्याच्या तयारीत असतांनाच बघता बघता तिचं रूपांतर एका पंख छाटलेल्या पक्षिणीत झाल्याचं दृश्य आलं आणि त्या घामाने ओल्याचिंब झाल्या. मघाशी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना कोणीतरी नाक पुसण्यासाठी मागून हातात दिलेला रुमालही भिजून ओलाचिंब झाला. आता आपण एखाद्या समोपदेशकाकडे गेल्याशिवाय आपले विचार आटोक्यात येणार नाहीत, असा विचार करून ताईंनी एका प्रख्यात समोपदेशकाकडे जाण्याचा निर्णय घेतला.

 

ताई एका प्रख्यात समोपदेशकाच्या क्लिनिकमध्ये पोहचल्या आहेत. सोबत नेहमीप्रमाणेच कार्यकर्त्यांचा घोळका आहेच. त्यातलाच एक नावनोंदणीसाठी पुढे सरसावतो. तेव्हढ्यात मागचे कार्यकर्ते घोषणा देतात, ‘कोण आली रे, कोण आली? महाराष्ट्राची वाघीण आली!’

कार्यकर्ता – (काउंटरवर जाऊन) नाव नोंदवायचं होतं.

काउंटरवरची मुलगी – हे काही प्राणिसंग्रहालय नाही. तिकडे न्या, प्राणिसंग्रहालयात.

कार्यकर्ता – अहो असं कायबी काय बोल्ता ? कार्यकर्ते प्रेमाने बोल्तात तसं.

काउंटरवरची मुलगी ताईंकडे एक कटाक्ष टाकते, तोंड वाकडं करते आणि फी घेऊन आत सोडते.

 

समुपदेशक – हे पहा फक्त या मॅडम इथे थांबतील. बाकी सगळे बाहेर थांबा.

सोबतचे कार्यकर्ते ‘कमलाताई , आगे बढ़ो , हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा देत बाहेर पडतात.

समुपदेशक – हं, ताई बसा. हळूच बसा. पडाल नाहीतर.

ताई – (उसळून ) मी का पडणारी दिसते का तुम्हाला ? ‘त्यांनी’ पाडली मला, प्रयत्नपूर्वक.

समुपदेशक – (हळू आवाजात) अगदी बरोबर ताई. आता मला सांगा, इतके कार्यकर्ते सोबत असतांना तुम्हाला असं अस्वस्थ का वाटतं ?

ताई – ते सगळं खरं आहे, पण कार्यकर्त्यांना घेऊन सगळीकडेच जाता येत नाही ना ! काही गोष्टींना एकट्यानेच तोंड द्यावं लागतं. बरं , आपलीच प्रतिमा जपण्यासाठी कार्यकर्त्यांसमोर सगळ्या गोष्टी सांगताही येत नाहीत. ‘ मान सांगावा जना आणि अपमान सांगावा मना.’ अशी परिस्थिती होते. नुसता कोंडमारा होतो मनाचा.

समुपदेशक – (समजावणीच्या सुरात) हे पहा ताई , असं काही फक्त तुमच्याच बाबतीत घडतंय असं काही नाही. ते आठवतं का, आपल्या कार्यकर्त्यांना ‘ हमारा नेता अंगार है , बाकी सब भंगार है’ अशी घोषणा द्यायला लावणाऱ्यांनाच कसं भंगार करून टाकलं होतं ? बदलले ना त्यांचे ही दिवस ?

ताई – (चिडून) ते सर्व ठीक आहे हो , पण हे दिल्लीश्वर आपलं काहीच ऐकून न घेता आपल्याला झापुन घेतात. त्यांच्याच आदेशाने आपल्याला कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा लागतो आणि कौरव -पांडवांचा दाखला देत सपशेल माघार घ्यावी लागते. कार्यकर्ते, ‘कोण आली रे, कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली’ अशा घोषणा देतात आणि त्याचवेळी आपल्याला दिल्लीश्वरांपुढे आपण निमुटपणे उभे आहोत आणि ते आपल्याला झापताहेत असं दृश्य दिसतं , सांगा काय करावं ? माणूस अस्वस्थ होणार नाही तर काय ? सांगा ना तुम्हीच .

समुपदेशक – (शांतपणे ) ताई मला वाटतं की, इतकी जर घुसमट होत असेल तर आपण पक्ष बदलावा. कार्यकर्ते आपल्यासाठी जी घोषणा देतात तिला साजेशा पक्षात जावं. ते स्वागतच करतील आपलं.

ताई – तेच सांगायला तर गेले होते दिल्लीश्वरांकडे.

समुपदेशक – मग ?

ताई – (शून्यात पाहत ) त्यांनी चिक्की दिली ना हातात !

बाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरू आहेत. ‘कोण आली रे, कोण आली ? महाराष्ट्राची वाघीण आली !’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button