मुक्तपीठ

पोलिस अधिकार्‍याला न्याय!

- भागा वरखडे

दहशतवाद्यांशी सामना करताना पोलिसांना अनेक नामुष्कीजनक प्रसंगाना तोंड द्यावे लागते. कधीकधी त्यातच वीरमरण येते. त्यानंतरही आरोप थांबत नाही. चकमकींना बनावट ठरविले जाते. काही चकमकी बनावट निघाल्या, म्हणजे सर्वंच चकमकींकडे त्याच नजरेने पाहून चालत नाही. दिल्ली बाँबस्फोटात 26 जणांचा बळी गेला होता. हे कृत्य देशद्रोहीपणाचेच आहे, त्यामुळे त्याला शिक्षा व्हायलाच हवी, यात कोणतीही शंका नाही. आता देशभरात गाजलेल्या दिल्ली पोलिसांच्या बाटला हाऊस येथील कारवाई आणि झालेल्या चकमक प्रकरणी न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला.

दिल्लीतील न्यायालयानं या प्रकरणातील दोषी दहशतवादी अरिझ खान याला थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या पोलिस अधिकारी मोहनचंद शर्मा यांना खरी आदरांजली मिळाली आहे. शर्मा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बाटला हाऊस येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर नियोजनबद्ध कारवाई केली; मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या बेछुट गोळीबारात शर्मा यांच्या पोटात, मांडीवर आणि उजव्या हातावर गोळ्या लागल्या आणि ते जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आरिज 19 सप्टेंबर 2008 रोजी आपल्या सहकार्‍यांसोबत बाटला हाऊस येथे उपस्थित होता. त्या वेळी शर्मा आणि हेड कॉन्स्टेबल बलवंत यांच्यावर जाणीवपूर्वक गोळ्या झाडल्या गेल्या. त्यामुळे आरिजला हत्येचा दोषी मानले जात आहे, असा निकाल न्यायाधीशांनी घोषित केला. तसेच या प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांना न्यायाधीशांनी महत्त्वाची सूचना दिली. बाटला हाऊस चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबावर किती परिणाम झाला, त्यांना किती रुपये नुकसान भरपाई दिली जावी, आरिज त्यांना किती रुपये देऊ शकतो, यासंबंधी अहवाल तयार करण्याचा आदेश न्यायाधीशांनी तपासी अधिकार्‍यांना दिला. 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीतील अनेक भागांमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात 26 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला, तर 133 नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यामागे इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाचा तपास करणार्‍या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला 19 सप्टेंबर 2008 रोजी या हल्ल्याच्या कट रचणार्‍या अतिरेक्यांसंबंधित महत्त्वाची माहिती मिळाली.त्यानंतर ही कारवाई झाली. त्या वेळी बनावट चकमकींचे प्रकार घडत होते. बाटला हाऊस चकमकीबाबतही असे प्रश्‍न उपस्थित केले गेले. त्यावर मानवाधिकार आयोगाची चौकशीही झाली. न्यायालयाने पोलिसांना क्लीन चिट दिली होती. अशा परिस्थितीत आता न्यायालयाने दिलेल्या निकालाचे राजकारण करणे योग्य नाही.

इंडियन मजाहिद्दीनचे पाच अतिरेकी दिल्लीतील बाटला हाऊस येथील बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये लपून बसले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या पाच अतिरेक्यांमध्ये आरिज खान, आतिफ अमीन, मोहम्मद साजिद, मोहम्मद सैफ आणि शहजाद अहमद यांचा समावेश होता. शर्मा जेव्हा आपल्या पथकाला घेऊन बाटला हाऊसला पोहोचले, तेव्हा पोलिस आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत शर्मा हुतात्मा झाले. शर्मा यांच्या हत्येप्रकरणी न्यायालायाने याआधी शहजाद अहमदला दोषी घोषित केले आहे. ही चकमक बनावट असल्याचा गंभीर आरोप दिल्ली पोलिसांवर झाला. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात खटलेही दाखल झाले. यानंतर उच्च न्यायालयाने न्यायालयीन चौकशी अमान्य केली. आता न्यायालयाने आपल्या निकालात ही अतिशय दुर्मिळ घटना असल्याचे नमूद केले आहे. यापूर्वी 2013 मध्ये शहजाद अहमद याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे दोघे बाटला हाउस चकमकीच्या वेळी पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. त्यांचे दोन साथीदार आतिफ आमीन आणि मोहम्मद साजिद हे ठार झाले. एका आरोपीला घटनेच्या ठिकाणीच अटक करण्यात आली होती.

आरीज खान हा 2008 मध्ये दिल्ली, जयपूर, अहमदाबाद आणि उत्तर प्रदेशातील न्यायालयात झालेल्या स्फोटांचा मुख्य सूत्रधार होता. या स्फोटांमध्ये 165 जण ठार झाले, तर 535 जण जखमी झाले होते. त्या वेळी आरिज याच्यावर 15 लाखांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले होते. तसेच इंटरपोलद्वार रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. आरिज खान उर्फ जुनैद याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने फेब्रुवारी 2018 मध्ये अटक केली. न्यायालयाने त्याला शिक्षेसोबत 11 लाखांचा दंडही बजावला आहे. त्यातील दहा लाख रुपये हे मोहनचंद शर्मा यांच्या कुटुंबीयाला दिले जातील. दोषीकडे घातक शस्त्रे होती आणि त्याच शस्त्राने त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता. एखाद्या व्यक्तीची हत्या आणि पोलिस अधिकार्‍याच्या हत्येत फरक आहे. ही बाब सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात मान्य केली आहे. बाटला हाउस चकमक प्रकरणी न्यायालयाने आरोपी आरीज खान याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि दिग्विजय सिंह यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्‍न उपस्थित केले होते. आता या सर्व नेत्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी जावडेकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button