मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते लवकरच अॅक्शन मोडमध्ये दिसतील, असं विधान राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. तसंच राज्याला मुख्यमंत्री नसल्याचा विरोधकांच्या आरोपांवरही त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं आहे. आरोप-प्रत्यारोप करणं विरोधकांचं काम आहे. जनतेला भरकटवणं हे विरोधकांचं काम आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांकडे लक्ष न देणंच योग्य आहे. ते काही ना काही आरोप करत असतात. लोकांची इमेज खराब करत असतात. जनतेला भरकटवत असतात. आपल्या कामावर आपण लक्ष केंद्रीत केलेलं बरं. हल्लीच जे सर्वेक्षण झालं त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टॉप-फाइव्हमध्ये आहेत आणि जनता जनार्दन मुख्यमंत्र्यांसोबत ठाम उभी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठणठणीत आहेत आणि लवकरच ते अॅक्शन मोडमध्ये दिसतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
कोरोनाची साथ अजूनही गेलेली नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. रुग्णसंख्या वाढत आहे, असंही ते म्हणाले. तसंच शाळेच्या मुद्द्यावर बोलत असताना पालकांना वाटत असेल तरच त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही हे पालक आणि शाळेनं ठरवायचं आहे, असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री ‘फिट अँड फाईन’
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले.
गेल्या काही दिवसांपूर्वी मानदुखीचा त्रास झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे गेले काही दिवस ते घरीच आराम करत होते. दरम्यान, या आजारपणातून बरे झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच उद्धव ठाकरे अशा पद्धतीने फोटोच्या माध्यमातून समोर आले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते झोपून आहेत, कशाचा तरी आधार घेऊनच त्यांना चालावे लागते, अशा काही वावड्या राजकीय वर्तुळात उठवल्या जात होत्या. मात्र, अशा वावड्यांना उद्धव ठाकरेंच्या आजच्या फोटोमुळे पूर्णविराम मिळाला आहे. तसेच, उद्धव ठाकरे ‘फिट अँड फाईन’ असल्याचे दिसून येत आहे.