राजकारण

विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन फडणवीसांचे ठाकरे सरकारला आव्हान

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत. ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे बहुमत आहे, मग घाबरताय का? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. ‘हात वर करुन का? घ्या मतदान, पाहूया ताकद. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. त्यानंतर फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, इम्पेरिकल डाटा संबंधात छगन भुजबळ यांनी भेट घेतली. मराठा आरक्षणावेळी आम्ही डेटा कसा गोळा केला, हे मी त्यांना सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने तो कसा व्हॅलिड ठरवला, तेही सांगितलं. तुम्ही पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्या, मी पर्सनली नोट तयार करुन देईन, मी तुमच्यासोबत काम करेन, सत्तारुढ नेत्यांना नेतृत्त्व करावं लागतं. मी पूर्ण करेन, असं फडणवीसांनी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. आता निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, पण फेब्रुवारीत मेजर निवडणुका येतील. त्यापूर्वी हे करणं आवश्यक आहे, असंही फडणवीस म्हणाले.

पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर मी बोलणे योग्य नाही

नाना पटोले बोलतात, मग पवार साहेब मत व्यक्त करतात, मग काही लोक नाना पटोलेंना न घेता पवारांना भेटतात. त्यातून सर्व काही कळतं, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. पंकजा मुंडे यांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे, त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही, असंही फडणवीस म्हणाले.

आम्ही सक्षम विरोधी पक्षनेते आहोत. लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत, हे सरकार आपल्या वजनाने कोसळेल, आज-उद्या कोसळेल हे मी कधी सांगितलं नाही, पण ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी पर्यायी सरकार देऊ, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button