
नवी दिल्ली : महाराष्ट्रात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण, महाडनंतर आता कोल्हापूर आणि सांगळीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे ७० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशावेळी केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी अमित शाहांना महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती दिली.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. यावेळी सुप्रिया सुळे, अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी अमित शाहांना महाराष्ट्रातील महापुराची माहिती दिली. तसंच रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांचीही माहिती दिली. त्यावेळी अमित शाहांकडूनही महाराष्ट्राला केंद्राकडू सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. या भेटीनंतर सुळे यांनी ट्विट करुन अमित शाह यांचे आभार मानले आहेत.
Met Union Home Minister Hon. @AmitShah Ji regarding the Flood Situation in Maharashtra along with @ShivSena Rajya Sabha Members of Parliament- Hon. Anil Desai Ji and Priyanka Chaturvedi (@priyankac19
).
Thank you Hon. Amit Shah Ji for your time and assuring help for Maharashtra. pic.twitter.com/U8Pe2MbKMg— Supriya Sule (@supriya_sule) July 23, 2021
राज्यात सर्वदूर होत असलेल्या अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार जातीने लक्ष ठेवून आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे तसेच स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रीमहोदयांना तसेच लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत.




