अखेर राहुल अन् प्रियंका गांधींकडून लखीपुरात पीडित कुटुंबीयांचे सांत्वन

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर, रात्री उशीर राहुल गांधी आणि प्रियंका यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. लवप्रीतने दिलेलं बलिदान कधीही विसरणा नाही, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. तसेच, जोपर्यंत पीडित कुटुंबीयास न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह चालूच राहिल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. राहुल गांधी हे काही वेळापूर्वीच लखनौला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावून निघाले होते. रात्री उशिरा राहुल गांधी लखीमपूरा येथे पोहोचले. यावेळी, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लवप्रीतच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
राहुल गांधी यांनी सकाळी पत्रकार परिषदेत लखीमपूर खेरीतील झालेल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. “उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना मारले जात आहे. त्यांच्या सरकारमधील आमदारानेही बलात्कार केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नव्या प्रकारचे राजकारण होत आहे. बलात्कार, शेतकऱ्यांना मारणे सुरू आहे. जे मारतात ते जेलच्या बाहेर असतात आणि जे मरतात ते आतमध्ये जातात. पण, आम्हाला मारले, गाडले तरी काही फरक पडत नाही. आमचे ट्रेनिंगच तसे झाले आहे. हा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. त्यामुळे मी लखनऊला जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
प्रियंका गांधींचा योगी सरकारला इशारा
जोपर्यंत लखीमपूर हिंसेला जबाबदार असलेल्या मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, जोपर्यंत त्या मुलाला अटक केली जात नाही, तोपर्यंत मी लढतच राहणार. मी तसूभरही मागे हटणार नाही. मी पीडितांच्या कुटुंबांना तसे वचनच दिलं आहे, असं काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सांगितलं.
प्रियंका गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट योगी सरकारला इशारा दिला आहे. मी लढणारच. जोपर्यंत या मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, जोपर्यंत या मुलाला अटक केली जात नाही. तोपर्यंत मी हटणार नाही. कारण मी त्या कुटुंबाला वचन दिलं आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे. नैतिकतेच्या आधारे मंत्र्याने राजीनामा दिलाच पाहिजे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
लखीमपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय गंभीर
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून गंभीरतेने घेतले असून गुरुवारी सरन्यायाधीश एनवी रमण यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सुनावणी घेतली जाणार आहे.
मंगळवारी लखीमपूर खीरी हिंसाचाराचा मुद्दा दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात नेला होता. त्यांनी याचिका दाखल करून मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करणे आणि त्यांना शिक्षा करण्याची मागणी केली होती. गेल्या तीन दिवसांपासून देशभरातील वातावरण संतप्त झाले आहे. भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने त्याची कार आंदेलक शेतकऱ्यांवर चढविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री तिथे आपला मुलगा नव्हता असा दावा करत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरण वाढत असल्याचे पाहून या मंत्रीपुत्रावर गुन्हा दाखल केला परंतू ८ जणांचा मृत्यू झालेला असला तरीदेखील एकालाही अटक केलेली नाही. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, राहुल गांधी हे नुकतेच लखीमपूरला पोहोचले असून त्यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या प्रकरणामुळे योगी सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर एवढा मोठा प्रकार घडल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत गृह मंत्रालय आणि पोलिसांना मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश द्यावेत. हिसाचार आणि हत्येविरोधात उच्च स्तरीय न्यायिक तपास केला जावा. सीबीआयला सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याचे तसेच ठराविक वेळेत चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असे म्हटले आहे. यानुसार गुरुवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.