राजकारण

‘ते’ पत्र खरंच परमबीर सिंगांनी लिहिलंय का? संजय राऊत यांचा सवाल

देवेंद्र फडणवीसांकडे निर्देश करत तिरकस भाष्य

मुंबईः शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. तसंच, ते पत्र खरंच परमबीर सिंह यांनी लिहलंय का?, असा तिरकस सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली होती. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारवर आरोप केले आहेत. आज महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार होते. मात्र राज्यपाल आज नियोजित दौरा असल्यानं देहरादूनला गेल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट टळली आहे. यावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल सध्या खूप व्यस्त असतात, त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ आहे की नाही हे पण मला माहिती नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. तसंच, मुख्यमंत्री व कॅबिनेटनी पाठवलेल्या १२ आमदारांच्या नावांचा राज्यपाल आभ्यास करतायत का? अभ्यास करुन पीएचडी करणार का?, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं आहे. गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्राची चौकशी करा अशी मागणी केली होती. यावर बोट ठेवत संजय राऊत यांनीही ‘चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या, असं म्हणत फडणवीसांवर टोला लगावला आहे.

चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे. राज्यातील विरोधी पक्षनेते हे मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळेच कदाचित ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत. विरोधी पक्षनेत्याने त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असं वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसतं याचं भान प्रत्येत विरोधी पक्षनेत्याने ठेवलं पाहिजे,’ असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे. शिवाय, वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसं होतं, लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button