
नवी दिल्ली : मी असं ऐकलं आहे की लस घेतल्यानंतर १०० पैकी एका व्यक्तीला त्रास होतो. जास्त ताप आल्यानंतर मानसिक संतुलनही बिघडतं असं डॉक्टर सांगतात. पण मला जाणून घ्यायचं आहे की, काल जेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी २.२२ कोटींपेक्षा जास्त लोकांना लसीचे डोस दिले आहेत. त्यापैकी काहींना त्रास झाला हे मी ऐकले आहे. पण हे मी पहिल्यांदाच पाहात आहे की एवढ्या लोकांना लसींचे डोस दिल्यानंतर रात्री १२ वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू झाला. त्यांचा ताप वाढला आहे. याचं काही लॉजिक असू शकतं का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही विचारला आहे.
देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. एका दिवसात २ कोटी २२ लाख डोस देण्यात आले आहेत. सर्वाधिक डोस भाजपशासित राज्यांमध्ये देण्यात आले. यापूर्वी एका दिवसात सर्वाधिक १ कोटी ४१ लाख डोस देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रांवर विशेष मोहीम राबविण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी देशभरातील डॉक्टर आणि कोरोनायोद्धांचं अभिनंदन केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी यावेळी लसीकरणाच्या विक्रमावरून अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांशी झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान, मोदींनी उपस्थित असलेल्या डॉक्टरांना ‘काल अडीच कोटी लोकांना लस मिळाली, मग एका पक्षाला ताप का आला? असं म्हटलं. हे ऐकून डॉक्टरही हसले. गोव्यातील १०० टक्के लोकसंख्येला कोविड -१९ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिल्याने आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण लाभार्थ्यांशी संवाद साधला. लोकांना आम्ही लस दिली तेव्हा त्यांना कोरोनाला रोखण्यासाठी ही लस देत असल्याचं सांगितलं. लसीकरणानंतर तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. लस घेतल्यानंतर मास्क घालणे, हात धुणे आणि अंतर राखणे हे सुरूच ठेवायचे आहे, असं मोदींसोबत संवाद साधणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.