
मुंबई : मुख्य प्रवक्तेपदाच्या निवडीवरून काँग्रेसमधील धुसफूस समोर आली असून सचिन सावंत कमालीचे नाराज झाले आहे. त्यामुळे त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर सावंत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरुन वाद होत असल्याचे समोर आले आहे. आता मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सचिन सावंत यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. सचिन सावंत यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय बंगल्यावर जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत सावंत यांनी जवळपास १० मिनिटं चर्चा झाली केली. मात्र, सावंत आणि मुख्यमंत्र्यांमधल्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. काँग्रेसच्या नेत्याने नाराजी व्यक्त केल्यानंतर थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षांपासून सावंत हे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम पाहत होते. वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिन सावंत यांनी काँग्रेस पक्षाची सडेतोड भूमिका मांडली होती. अनेक मुद्यांवरून त्यांनी भाजपला जशास तसे उत्तर सचिन सावंत यांनी दिले होते. पण, प्रवक्तेपदाची नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली आहे. नवीन नियुक्तीनुसार मुख्य प्रवक्तेपदी सचिव सावंत यांच्या जागी अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून प्रवक्ते राहिलेले सचिन सावंत नाराज झाले आहे. सावंत यांनी तडकाफडकी आपल्या प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला.
एवढंच नाहीतर सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटमधून प्रवक्तेपदाचा उल्लेख सुद्धा काढून टाकला आहे. सावंत यांनी आपली प्रवक्तेपदी निवड केली नसेल तर नवीन पदाची जबाबदारी देण्याची मागणी केली असल्याची माहितीही समोर आली. आज सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ते काय निर्णय घेणार हे पाहणे काँग्रेससाठी महत्वाचे ठरणार आहे.