हरिद्वार : ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. कोरोनावरील उपचारात सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरलं. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसिविर इंजेक्शनही फेल ठरल्याचं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. यावरून आयएमएने त्यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही या प्रकरणाची दखल घेत रामदेव बाबा यांना फटकारले होते. यानंतर रामदेव बाबांनी सपशेल शरणागती पत्करली असून ते वक्तव्य मागे घेतल्याचे ट्विट केले आहे.
हर्षवर्धन यांना ट्विट करताना त्यांनी तुमचे पत्र मिळाले. यासंदर्भात उपचार पद्धितींच्या या संघर्षपूर्ण वादाला मी इथे थांबवतो आणि मी केलेले वक्तव्य मागे घेतो असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.
संपूर्ण देशातील नागरिकांसाठी डॉक्टर्स देवदूत ठरत आहेत. ते दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत. बाबा रामदेव यांनी उपचारांसंबंधी केलेलं विधान म्हणजे कोरोना योद्धांच्या भावनांना ठेच पोहोचवणारं आहे. यासंदर्भात फक्त स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. बाबा रामदेव यांनी आपलं विधान जाहीरपणे मागे घ्यायला हवं, असं डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
कोरोनावरील उपचारांमध्ये ॲलोपॅथी चिकित्सेला तमाशा, निरुपयोगी आणि दिवाळखोरी ठरवणं अतिशय दुर्दैवी आहे. आज लाखो लोक ॲलोपॅथीमुळेच कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. आज देशात कोरोनाचा मृत्यूदर फक्त १.१३ टक्के आणि बरं होण्याचं प्रमाण ८८ टक्के इतकं आहे. यामागे ॲलोपॅथी आणि डॉक्टरांचं सर्वात मोठं योगदान आहे. उपचारांच्या सध्याच्या प्रक्रियेला तमाशा संबोधनं ॲलोपथी उपचारांचीच नव्हे, तर डॉक्टरांच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचविण्यासारखं आहे. तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणावर मी अजिबात संतुष्ट नाही, असं रोखठोक मत डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे.