Top Newsराजकारण

शिवसेनेच्या दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गांच्या कामात अडथळे; गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सातत्याने अडथळे आणत आहेत याकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष वेधले आहे. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पात्रात गडकरी यांनी म्हटले आहे की, हा अनुभव लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवावीत किंवा कसे या बद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करीत आहे. ही कामे आहेत त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघातांचे प्रमाण वाढेल आणि जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल. हे असेच चालत राहिले तर केवळ वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयास गांभीर्याने विचार करावा लागेल. ही कामे ‘डिस्कोप’ केली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू. तसे झाले तर महाराष्ट्राचा नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण कृपया यातून मार्ग काढावा, असे गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांनी पाठविलेल्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी गृह विभागाला दिल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु असताना शिवसेनेचे कार्यकर्ते कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण करीत काम बंद पाडत आहेत. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे दिला आहे.

अकोला व नांदेड या २०२ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज २ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (१२ किमी) निर्माण करण्याच्या कामाचादेखील समावेश आहे. परंतु सदर बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले आहे. या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.

पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले आहे. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम विशेषत: सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविलेले होते अशी माहिती देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून कंत्राटदारांचे अधिकारी,कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

गृह विभागाने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना १३ ऑगस्टला एक पत्र पाठवून वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत आहेत, विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भांडावून सोडत आहेत व त्यांनी न ऐकल्यास त्यांचे काम बंद पाडत आहेत या गडकरी यांच्या तक्रारीबाबत पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारी, या तक्रारींवरून लोकप्रतिनिधींवर काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत का याची माहितीही गृह विभागाने मागविली आहे. पोलीस महासंचालकांनी यासंदर्भात वाशीमच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button