मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू आणि अंबानी स्फोटके प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. स्फोटके प्रकरणात अटक झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर सचिन वाझे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याप्रकरणी आदेश काढले आहेत. याशिवाय लवकरच पोलीस अधिकारी रियाझ काझी आणि सुनील माने यांनाही सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे जवळपास १६ वर्षांनंतर २०२० मध्ये पोलीस दलात परतले होते. मात्र मनसुख हिरेन हत्याप्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर, त्यांना आता पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
सुनील माने हा मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांचचा पोलीस निरीक्षक आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये मानेची चौकशी सुरु होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाचीही पूर्ण कल्पना होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने केला होता.
या मॅपमध्ये जो रुट आहे, त्याच मार्गावरुन २४ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया परिसरात आणून पार्क करण्यात आली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. मात्र स्फोटक प्रकरणातही सुनील मानेचा सहभाग आढळतो का, याचा तपास एनआयएकडून सुरु आहे. सुनील मानेच्या मोबाईलमधून एक मॅप एनआयएच्या हाती लागला आहे. हा नकाशा प्रियदर्शनी पार्क, चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा आहे, अशी माहितीही एनआयएने दिली.
अँटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने १९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सचिन वाझेने कोर्टाकडे काही खासगी गोष्टींसाठी केलेला अर्ज कोर्टाने स्वीकारला आहे. वाझे याला जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज, वॉशिंग पावडर, साबण, मीठ, साखर आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधे देण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत एनआयएने सचिन वाझे याला अटक केली आहे. सध्या तो कोठडीत आहे.
मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं, याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तत्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता.
रियाझ काझी हा सचिन वाझे याचा सीआययूमधील निकटचा सहकारी होता. सचिन वाझे याने अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या केलेल्या तपासात तो सहभागी होता. याशिवाय, सचिन वाझे याच्या सांगण्यावरून रियाझ काझी यानेच गाड्यांच्या नंबर प्लेट तयार करुन आणल्याचा आरोप आहे. याशिवाय, सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फूटेजही रियाझ काझी याने ताब्यात घेतले होते. त्यामुळे रियाझ काझी याला अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तो माफीचा साक्षीदार झाल्यास सचिन वाझे याच्या कृत्यांचा पर्दाफाश होणार आहे.