राजकारण

ठाकरे सरकारच्या गुन्हेगारीकरणा विरोधात २० हजार सभा घेणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई: महाआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात छोट्या सभांद्वारे व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रदेश, जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना बिनदिक्कत संरक्षण दिले जात आहे. तरुणीवर बलात्कार, तरुणींचे संशयास्पद मृत्यू या सारख्या गुन्ह्यांमध्ये राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांची नावे थेटपणे घेतली जात आहेत. या मंत्र्यांना सरकारकडून संरक्षण दिले जात आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी भाजपाने आंदोलन केल्यावरच संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबतही राज्य सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. चुकीच्या वीज बिलांमुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे, या व अशा अनेक मुद्द्यांबाबत जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या अभियानात पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील २० हजार शक्तिकेंद्रांच्या माध्यमातून २० हजार छोट्या सभा, बैठका घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. कोरोनामुळे आलेले सर्व निर्बंध पाळून हे अभियान राबविले जाणार असल्याचे ते म्हणाले. कोरोना कालखंडातील स्थिती अतिशय समर्थपणे हाताळल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button