कोरोनाने देशातल्या सगळ्या राज्यकर्त्यांना उघडे पाडून त्यांचा खरा चेहरा लोकांना दाखवून दिला आहे. वाढते कोरोना रुग्ण आणि अपुरी पडणारी यंत्रणा मान्य करून ज्या राज्यांनी लोकांना खरे स्वरूप दाखवत प्रामाणिकता दाखवली त्या राज्यात जनतेने मदत करून हातभार लावला आणि राज्य नियंत्रणात यायला सुरुवात झाली. मात्र ज्यांनी सत्य लपवले त्यांना लोकांची शव गंगेत फेकून देण्याची नामुश्की पत्करावी लागली.
परवा बिहारमध्ये काही गंगा घाटांवर शेकडो शव तरंगत आल्याची घटना उघड झाली. या घटनेने बिहार, उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारसुद्धा उघडे पडले आहे. असाच प्रकार उत्तराखंडमध्येही झाला आहे. कुंभमेळ्यात ज्या हजारो लोकांना कोरोनाची लागण झाली त्यातील शेकडो लोकांचा मृत्यू झाल्यावर त्यांची शव गंगा नदीत फेकून देण्यात आली. कोरोना रुग्णसंख्या आणि मरणार्यांची संख्या पाहता मृतांवर अंतिम संस्कार करण्यासाठी ज्या प्रदेशांच्या यंत्रणा तयार नाहीत त्यांनी या आधी कोणत्याही संकटाचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत असे पोकळ दावे केले होते हे आता सिद्ध झाले आहे.
आपल्या देशात जिवंत माणसाला सन्मान नसला तरी मृत्यूनंतर सन्मान देणार्या खूप यंत्रणा आहेत. मृत्यूनंतरच्या कर्मकांडांना पवित्र मानणार्या खूप धार्मिक संस्था आणि दानशूर आपल्या देशात आहेत. उपासमारीने मरणाला कवटाळणार्या अनेकांच्या तेरवीत मिष्ठान्न देणारे दानशूर इथे कमी नाहीत. सरकार मात्र आपत्ती काळात अपुरे पडतेय हे कबूल करायला तयार नाही हे आपल्या देशाचे मोठे दुर्दैव आहे. जागतिक महासत्ता होण्याच्या गप्पा मारल्या जाणार्या आपल्या देशात ९० टक्के स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवलेल्या नाहीत. कोरोना काळात वेटिंगवर असलेले मृतदेहांचे ढीग जाळण्यासाठी पुरेसे लाकूडही उपलब्ध होत नाही.
दिल्लीच्या एका स्मशानभूमीत ६० शव सहा दिवस आपला नंबर कधी लागेल या प्रतीक्षेत पडून राहणे हा आपल्याला बलाढ्य यंत्रणांचा पराभव वाटत नाही. ज्या राजधानीत नवे संसद भवन आणि नवे प्रधानमंत्री निवास बांधले जात आहे, त्याच दिल्लीत पुरेशा स्मशान घाटांची व्यवस्था एवढ्या वर्षात होऊ शकली नाही. कोरोना रुग्णांना बेड नाही आवश्यक ते उपचार मिळत नसल्याने जीव मुठीत घेऊन रुग्णांना पळावे लागते त्याची आता कुणालाच लाज वाटत नाही.
जागतिक दर्जाचा विद्वान असल्याचा आव आणणारी प्रधानमंत्री मोदी यांची भाषणे आणि ‘मन की बात’ ऐकून लोक आता कंटाळले आहेत. शेकडो लोकांचे मृतदेह गंगेत वाहून जाताना ज्या देशाच्या प्रधानमंत्र्याला काहीच वाटत नसेल तर त्या देशाचा देवच वाली आहे असे हताश उद्गार लोक काढायला लागले आहेत.
कुंभमेळा असो की गुजरातमधील धार्मिक प्रथा असो, कोरोना काळात त्यांचे मतांच्या लाचारीसाठी निर्लज्ज समर्थन करणार्या नेत्यांनी कोरोनाचा विस्फोट झाल्यावर मात्र आपल्या मतदारांची काळजी घेतली नाही, हे गंगेत वाहून जाणार्या प्रेतांवरून लक्षात येते. आपल्यापेक्षाही भयंकर संकटांना जगातले अनेक देश सामोरे गेले आहेत, मात्र एकाच संकटात यंत्रणा हतबल आणि गोळामोळा झालेली बघितली नाही ते आपल्या देशात बघायला मिळत आहे. आजही कुठे नेमकी कशाची गरज आहे हे केंद्र सरकार खुल्या मनाने सांगायला तयार नाही. संकटाचा सामना करण्यासाठी तयार असल्याची राणा भीमदेवी थाटात घोषणा केली जाते आणि प्रत्यक्षात रुग्णवाहिका, औषधे, प्राणवायू यांचा मोठा दुष्काळ असतो याचा अनुभव या काळात देशातले नागरिक घेत आहेत.
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात एकाच संकटात लोकशाहीची आणि ती जिवंत ठेवणार्या माणसांची मेल्यावर गंगेच्या प्रवाहात अशी वाताहत होत असेल तर आपण नेमके कशाच्या बाबतीत सक्षम आहोत हे तरी एकदाचे प्रधानमंत्र्यांनी आणि त्यांना मानणार्या कोट्यवधी लोकांनी जाहीर केले पाहिजे. दुसर्यांदा सत्तेत आल्यावर कुणाचे गंगेत घोडे न्हाले असतील इथे मात्र मानवता गंगेत वाहवत जात आहे हे अधिक लज्जास्पद आहे.