मुक्तपीठ

वृत्तपत्र मालकाचे कार्यकारी संपादकास उत्तर

मुकुंद परदेशी (संपर्क 78750 77728)

प्रति,

कार्यकारी संपादक,

तुमचे पत्र मिळाले. तोंड लपविण्यासारखी कामगिरी असली आणि काही प्रश्नांना उत्तरं देण्याची हिंमत नसली की, प्रत्यक्ष भेटून बोलण्यापेक्षा पत्र लिहीणेच सोयीचे असते. पण पत्र लिहिणे ही सुद्धा एक कलाच आहे. उगाच वृत्तपत्रात अग्रलेख लिहिल्यासारखं पत्र नसतं लिहायचं. आपल्या मालकाला तरी नक्कीच नसतं लिहायचं , हेसुद्धा तुम्हाला कळू नये ? शिवाजी महाराजांच्या नावाआधी जसे भोसलेकुलोत्पन्न, भोसलेकुलभूषण असं लिहिलं जायचं तसं काही आमच्या नावाआधी लिहून आमच्या कर्तबगारीचा गौरव करावा इतकी साधी गोष्टही तुम्हाला कळू नये ? कार्यकारी संपादक आहात की, वर्तमानपत्र विकणारे? आमच्या पिताश्रींच्या काळापासूनच काही माणसं आम्हांला छळत आली आहेत. त्यातली काही त्यांनी हाकललीत तर काही स्वतःहूनच दूर गेलीत, (पण तरी त्यांचं आम्हाला छळणं सुरूच आहे.) काही अजूनही आमच्या बोकांडी बसलेलीच आहेत. काही माणसांच्या बाबतीत आमच्या पिताश्रींची निवड चुकलीच.असो.

दुसरं महत्वाचं म्हणजे बाळराजेंसाठी आणलेल्या कॅडबरीजचा उल्लेख पत्रात करण्याची काय गरज होती ? घराच्या खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी नेलेल्या पेपर्सचा हिशेब मांडा आणि त्या पैशातून त्या दुकानदाराची उधारी चुकवा. आम्ही कोणाचाही हिशेब बाकी ठेवत नाही.ताबडतोब चुकता करतो. उशीर झाला तर व्याजासकट चुकता करतो. विचारा हवं तर त्या देवानाना नागपूरकरांना. आणि बाळराजेंना कोणते शोक लागत आहेत याची वासुगिरी करण्यापेक्षा आपल्या वृत्तपत्राचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्याचा खप वाढविण्यासाठी थोडे प्रयत्न केले असते तर आज आम्हाला पत्र लिहून असं रडगाणं गाण्याची पाळी नसती आली .

आणि वर्तमानपत्राचा खप कमी झाला म्हणून इतकं अस्वस्थ होण्याचं काय कारण आहे ? एक गोष्ट लक्षात घ्या. वर्तमानपत्राचा खप आणि राजकीय पक्षाच्या आमदारांची संख्या कमीजास्त होणारंच. त्याला काहीच महत्त्व नसतं. आपण समोरच्याला कसे भारी पडतो, त्याला समोर मैदानात कोणीच पैलवान दिसत नसतांना ; आपण अचानक शड्डू ठोकून त्याला कशी धोबीपछाड देतो ते महत्वाचं असतं. वेळ पडली तर स्वतः आमदार नसलेला छप्पन आमदारवाला मुख्यमंत्री बनतो आणि एकशे पाच आमदार पाठीशी असणारा मात्र ‘ मी परत येईन. मी परत येईन’चा जप करत करतच झोपी जातो ! हा इतिहास ताजा आहे आणि असा इतिहास घडविण्यासाठी अंगी हुशारी लागते. विचारा हवं तर त्या देवानाना नागपूरकरांना. आपल्या वर्तमानपत्राचा खप कमी झाला म्हणून चिंता करू नका. वाढेल तो हळूहळू हळूहळू. टिकून राहा. टिकून राहणं महत्वाचं असतं. मी जे सदासर्वकाळ, ‘ वारंवार हात धुवा, मास्क वापरा, अंतर राखा’ असं सांगत असतो आणि लोकांच्या टवाळीचा विषय होत असतो ते कशासाठी ? टिकून राहण्यासाठीच ना ? टिकून राहिलं की प्रगती आपोआपच होते. आता हेच पहा ना, कंपाऊंडर टिकून राहिले म्हणून तर ते डॉक्टरांपेक्षा हुशार झालेत की नाही ?

दुसरे असे की, ते कोण नावात दोनदा ‘ना’ ‘ना’ असणारे गृहस्थ आहेत, ज्यांनी म्हणे आपलं वर्तमानपत्र वाचणं बंद केलं आहे. त्यांना काही जास्त महत्त्व देऊ नका. ते त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असू देत नाहीतर राष्ट्राध्यक्ष असू देत, आपल्याला काय फरक पडतो ? त्यांचा पक्षच आता नामशेष होत चालला आहे. आणि ही नावात ‘ना’ असणारी माणसं ना जर जास्तच हेकट असतात असा माझा कोकणापासून ते थेट विदर्भापर्यंतचा अनुभव आहे ! ते विरोधी पक्षनेते जर आपल्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात दिवसातून दहा-बारा रद्दीवाल्यांना पाठवत असतील तर घाबरू नका, उद्यापासून आपण त्यांच्या घरी दिवसातून दहा- बारा मानसोपचारतज्ज्ञांना पाठवत जाऊ. कार्यकारी आहात, कार्य करीत रहा.

तुमचा मालक

महाराष्ट्रभूषण उधोजीराजे

ता. क. – शाहण्याचे गुलाम व्हावे ,पण वेड्यांचा मालक होऊ नये , असं म्हणतात. ते खरं असावं असं वाटू लागलं आहे. सूज्ञास अधिक काय सांगावे ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button