Top Newsराजकारण

गोव्यात भाजपला धक्का; ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबोंचा राजीनामा

पणजी : शनिवारी गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशात आता गोव्यातील भाजपचे कलंगुटमधील आमदार आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी राजीनामा दिला आहे. लोबो यांनी आमदार आणि मंत्रीपदाचाही राजीनामा दिला आहे. सोमवारी सकाळी आपला मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.

याबाबतची माहिती देताना लोबो म्हणाले की, मी गोवा मंत्रिमंडळ आणि आमदार या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. गोवा भाजप मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेताना मला दिसत नाही, ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यांना भाजपने बाजूला केलं आहे.

मायकल लोबो आता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे. गेल्या वर्षभरापासून लोबो यांनी सरकारवर नाराजी दाखवत आरोप करण्यास सुरुवात केली होती. यामुळे ते बरेच चर्चेत होते. मायकल लोबो हे २००५ साली भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांनी २०१२ साली भाजपकडून निवडणूक लढवली होती. ते सलग दोन वेळा आमदार झाले. गेल्यावर्षी त्यांना ग्रामीण विकास व घनकचरा व्यवस्थापन मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. मात्र, आता त्यांनी मंत्रीपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मी गोव्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कलंगुट मतदारसंघातील लोक माझ्या निर्णयाचा आदर करतील अशी आशा आहे. पुढे काय पाऊल टाकायचे ते बघू. इतर पक्षांशी चर्चा सुरु आहे, असं मायकल लोबो यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button