काँग्रेस पक्षावर आर्थिक संकट; पदाधिकाऱ्यांना रेलवे प्रवासाचा सल्ला
नवी दिल्ली : काँग्रेसने पक्षाच्या खासदारांना पक्षाकडून पैसे घेण्याऐवजी त्यांना देण्यात येणाऱ्या विमान वाहतुकीचा लाभ घेण्याचा आग्रह केला आहे. त्याचसोबत पार्टी फंडात दरवर्षी ५० हजार रुपये देण्यासही सांगितले आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं खर्चात बचत आणि निधी जमा करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. आर्थिक संकटाशी लढणाऱ्या काँग्रेसनं पक्षाच्या सचिवांपासून महासचिवांपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या आहेत.
काँग्रेसचे कोषाध्यक्ष पवन बन्सल म्हणाले की, पक्षाचा खर्च कमीत कमी करण्याचा विचार आहे. एक एक रुपया वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सचिवांना रेल्वेने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचसोबत ज्याठिकाणी शक्य आहे तिथे सर्वात कमी हवाई वाहतुकीवर खर्च होईल अशी काळजी घ्या. संसद सदस्य आणि महासचिवांना प्रवासासाठी तुमच्या हवाई वाहतुकीचा लाभ करून घ्यावा असंही सांगितल्याची माहिती देण्यात आली.
काँग्रेसच्या मार्गदर्शन सूचनेत म्हटलंय की, अखिल भारतीय काँग्रेस समिती सचिवांना १४०० किमी प्रवासासाठी ट्रेनचं भाडं दिलं जाईल. १४०० किमीपेक्षा जास्त लांबचा प्रवास असेल तर सर्वात कमी हवाई वाहतुकीचा खर्च दिला जाईल. विमान वाहतुकीचा खर्च महिन्यातून दोनदा दिला जाईल. जर ट्रेनचं भाडं विमान वाहतुकीपेक्षा कमी असेल तर विमान वाहतूक करू शकता असं सांगण्यात आलं आहे. कॅन्टीन, स्टेशनरी, वीज, वर्तमान पत्र, इंधन यावरील खर्च कमीत कमी करावा असं म्हटलं आहे.
इतकचं नाही तर पक्षाच्या सचिव, महासचिवांच्या फंडात १२ हजार रुपये आणि १५ हजार रुपये अनुक्रमे कपात केली जाणार आहे. बहुतांश नेते कधीतरी या रक्कमेच्या वरचा खर्च करतात. आम्ही या खर्चातही बचत करण्याचा प्रयत्न करत आहोत. काँग्रेस खासदारांनी दरवर्षी पार्टी फंडात ५० हजार रुपये योगदान द्यावं. तसेच पक्षाच्या समर्थकांकडून दरवर्षाला ४ हजार रुपये मागितले जातील असं पक्षाकडून सुचित केले आहे.
सत्ताधारी भाजपला २०१९-२० या वर्षात तब्बल २५५५ कोटींच्या देणग्या मिळाल्या. कोणाकडून ते माहीत नाही. मात्र विविध राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांपैकी ७६ टक्के एकट्या भाजपला मिळाल्या. विरोधात असलेल्या काँग्रेसला ६८२ कोटी रुपये मिळाले. बाकी राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनाही देणग्यांतून मोठ्या रकमा मिळाल्याचे दिसते. पण या देणग्या देणाऱ्या कंपन्या वा व्यक्ती कोण आहेत, ते मात्र गुलदस्त्यातच आहे. शिवाय कोणतीही कंपनी वा व्यक्ती लाखो आणि कोटींच्या देणग्या राजकीय पक्षांना का देतात, हेही कळत नाही. पूर्वी, जेव्हा काँग्रेस सत्तेत असताना देणग्या तिथे जात, भाजपला कमी मिळत. आता काँग्रेस कमी राज्यांत सत्तेवर असल्याने देणग्यांचा ओघ आटला आहे.