बेळगाव महापालिकेवर मराठी भाषकांचीच सत्ता येणार : संजय राऊत
Only Marathi speakers will come to power in Belgaum Municipal Corporation: Sanjay Raut

मुंबई : बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज ३ सप्टेंबर रोजी मतदान सुरु असून ६ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि इतर आमचे मराठी संघटना मिळून ३० च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
मीही प्रचाराला जाणार होतो, पण प्रचाराला गेल्याने एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचे ठरवले आहे. तसेच, मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली. भगवा उतरवला, असे अनेक कृत्य कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसेच उत्साही वातावरण दिसत आहे. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असे संजय राऊत म्हणाले.




