
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी पीएमसी बॅंक घोटाळ्यातील पैसे शिवसेना नेते संजय राऊत कुटुंबीयांना मिळाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केला होता. याप्रकरणी संजय राऊत यांनी चंद्रकात पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.
यासंदर्भात ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. माझ्या आणि माझ्या पत्नीविरोधात बदनामीकारक, निराधार आणि बोगस टिप्पण्या केल्याबद्दल चंद्रकांतदादा पाटील यांना मी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. जर चंद्रकांत पाटील यांनी बिनशर्त माफी मागितली नाही, तर मी पुढील कायदेशीर कारवाई करेन आणि न्यायालयात जाईन, असे ट्विट संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे म्हटले होते. तसेच संजय राऊत हे सातत्याने माझ्यावर टीका करून मला भरपूर प्रसिद्धी मिळवून देत असतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. याशिवाय, संजय राऊत हे शिवसेनेचे नुकसान करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
तुम्ही अग्रलेखात लिहिले की, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला?” संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करुन, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरुन मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला, पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.