
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेसमोर आले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली आहे. मुंबईकरांच्या ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. यानंतर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. भाजपनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले असून, मुंबईकरांना ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना, घरच नाही, तर कर कुणाचा माफ करणार, अशी विचारणा करण्यात आली आहे.
घरच नाही तर कर कोणाचा माफ करणार? pic.twitter.com/Hy6RnwpraM
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 2, 2022
संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या या फोटोत काही कोळी बांधव ‘आवक विभाग’ अशी पाटी लिहिलेल्या कार्यालयासमोर उभे राहून दाद मागताना दिसत आहेत. मराठी माणसाला मुंबईतून वसई-विरारला हद्दपार केले. आता भूमिपुत्राची अवस्था तीच करणार आहात का, असा प्रश्न हे कोळीबांधव विचारताना दिसत आहेत. समोरच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्र्यांसारखी दिसणारी व्यक्ती उभी असून त्यांच्या हातात ‘कोस्टल रोड मच्छिमार्केट’ असे लिहिलेली एक बॅग दाखवण्यात आली आहे. याच फोटोसह केलेल्या ट्विटला घरच नाही, तर कर कुणाचा माफ करणार, असा खोचक सवाल करणारे कॅप्शनही देण्यात आले आहे.




