राजकारण

बेळगावात स्टेज, साऊंड सिस्टिमची मोडतोड; संजय राऊतांची प्रचार सभा उधळण्याचा प्रयत्न

बेळगाव : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सभेची बेळगाव प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतल्याचं पाहायला मिळतंय. कारण, बेळगाव प्रशासनाकडून स्टेज आणि साऊंड सिस्टिम काढण्यासाठी दादागिरी करण्यात येत आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. बेळगावात राऊतांची प्रचारसभा होणार आहे. तत्पूर्वी बेळगाव प्रशासनाची दादागिरी पाहायला मिळत आहे. मात्र, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी बेळगाव प्रशासनाला एकप्रकारे इशाराच दिलाय.

सभेची आणि साऊंड सिस्टिमची रितसर परवानगी घेतली असताना स्टेट, माईक तोडणं हे लोकशाहीचा, निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसतं? असा सवाल संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला विचारलाय. कलेक्टर किंवा अन्य ज्याने हे आदेश दिले आहेत, त्यांनी घटनेचा भंग केलाय. अनेक वर्षांपासून आमचा लढा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा लढा सुरुच राहील. ही दडपशाही, दादागिरी आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केलाय.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत यांची तोफ बेळगावात धडाडणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार इथं ही सभा होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हे युवकांचं आकर्षण ठरत आहेत. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून बेळगावसह महाराष्ट्रातील नेत्यांनी सभा घेण्याची घोषणा केलीय. त्याचाच भाग म्हणून संजय राऊत यांची सभा आज बेळगावमध्ये होत आहे. या सभेला हातकणंगलेचे शिवसेना खासदारधैर्यशिल माने यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 17 एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर कॉंग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button